‘मविआ’च्या बैठकीआधीच प्रकाश आंबेडकरांचा ‘खो’; 15 जागांचा उल्लेख करत सांगितला ‘तिढा’
Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभुमीवर जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीत जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. या बैठकीआधी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन नक्कीच वाढणार आहे. महाविकास आघाडीत पंधरा जागांवर तिढा आहे. हा तिढा सुटल्याशिवाय ते आमच्याबरोबर चर्चा करू शकत नाहीत. यानंतरच आम्ही आमच्या जागांसाठी मागणी करणार आहोत, असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले.
आंबेडकर पुढे म्हणाले, बाळासाहेब थोरातांबरोबर आज भेट आधीच ठरलेली होती. महाविकास आघाडीची आज बैठक आहे असं जे सांगितलं जात आहे ते बरोबर नाही. जे मला सांगण्यात आलं आहे त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मी एकत्रित बसणार आहोत. जागावाटपासंदर्भात त्यांच्यात जी काही चर्चा झाली आहे त्याची माहिती दिली जाणार आहे. तसेच ते आम्हाला किती जागा देणार, आम्ही किती जागांची मागणी करत आहोत यावर सगळं अवलंबून राहणार आहे. त्यांचं जे काही ठरत नाही त्यासाठीची ती बैठक आहे. वंचित आघाडीची अजून तरी त्यात काही भूमिका नाही.
‘युती अजून नाही, बैठकांना जाऊ नका’ प्रकाश आंबेडकरांचा कार्यकर्त्यांना खास मेसेज
दहा जागांच्या बाबतीत काँग्रेस आणि शिवसेनेत फरक आहे. पाच जागा अशा आहेत की ज्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षांचा अजून निर्णय झालेला नाही. एकूणच पंधरा ज्या जागा आहेत त्यावर त्यांचं एकमत झालेलं नाही अशी आमची माहिती आहे. त्यांचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी चर्चा करू शकत नाहीत. त्या पंधरा जागांतील एखादी जागा आम्ही मागितली तर मग आम्ही बोलायचं कुणाबरोबर? त्यामुळे हा जो तिढा आहे त त्यांचा तिढा आहे. हा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ते आमच्याबरोबर चर्चा करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
तिन्ही पक्षांचा तिढा मिटल्यानंतर जागांची मागणी करणार
अकोला मतदारसंघ काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीत तशा चर्चाही झाल्या आहेत. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ज्या जागा सुटतील त्या सुटतील. परंतु, आधी त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्याबरोबरचा तिढा सुटणार नाही. या तिन्ही पक्षांचा जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतर आम्हाला किती जागा हव्या आहेत ते आम्ही सांगणार आहोत, असे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.