‘खोटं बोला पण, रेटून बोला’; मराठी म्हणीचा आधार घेत खर्गेंचा मोदींवर घणाघात
INDIA Meeting : देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक (INDIA Meeting) मुंबईत पार पडली. यानंतर शुक्रवारी समारोपाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मराठी भाषेतील एका म्हणीचा उल्लेख करत केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.
खर्गे म्हणाले, आता मोदी (PM Modi) खोटं बोलतात पण. लोकांना ते खरं वाटतं. मराठी भाषेत एक म्हण आहे. खोटे बोला पण, रेटून बोला, असं ते करतात. आम्ही महागाई, बेरोजगारी विरोधात लढण्यासाठी एकत्र आलो आहोत. मोदींनी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या पण अजूनही सिलिंडर 700 रुपयांना मिळत आहे. मोदी गरिबांसाठी काम करणार नाही. आता गरीबांचा पैसा जात आहे, तो थांबविण्यासाठीच इंडिया आघाडी जिंकणं महत्वाचं आहे. त्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केले असून आगामी काळात त्यानुसार काम करणार आहोत,असे खर्गे म्हणाले.
‘पवारांनी थांबवलं पण, ‘ममता’ थांबल्या नाहीत; फडणवीसांनी सांगितलं इंडिया बैठकीत काय घडलं?
सध्याचे सरकार गरीबांसाठी काम करत नाही. वाढलेल्य गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आणि सरकार गरीबांसाठी काम करत असल्याचे सांगितले जात आहे. पण, तसे काहीच नाही. मोदीजी आधी 100 रुपये वाढवतात नंतर 2 रुपये कमी करतात. यातून मोदी सरकारने कोट्यावधी रुपये कमावले. गोरगरिबांचा खिसा कापला. गरीब लोकांचं शोषण करणे हीच त्यांचे धोरण आहे. पण आता तसं होणार नाही. इंडिया आघाडी ही परिस्थिती नक्कीच बदलेल असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.
इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
– इंडिया आघाडी आगामी लोकसभा निवडणुका एकत्रित लढणार
– लवकरच जागा वाटपाबाबत निर्णय घेऊन त्यांची घोषणा केली जाणार
– गिव्ह अँड टेक पॉलिसीवर इंडिया आघाडी काम करेल
– सामाजिक प्रश्न आर्थिक विकास यांसह विविध धोरणांवर ही आघाडी काम करेल
– लवकरच देशभरात इंडिया आघाडीच्या रॅली आयोजित केल्या जाणार
– देशातील सर्व भाषांमध्ये ‘जोडेगा भारत, जितेगा इंडिया’ या घोषवाक्यांसह इतरही घोषणा आणि स्लोगन प्रसारित केली जाणार