मोदी-शाह-नड्डांचे दौरे वाढले; भुजबळांनी बोटीची स्टोरी सुनावत भाजपला दिले आव्हान

मोदी-शाह-नड्डांचे दौरे वाढले; भुजबळांनी बोटीची स्टोरी सुनावत भाजपला दिले आव्हान

Chagan Bhujbal Criticized BJP : राज्यासह देशात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपाचे (BJP) केंद्रीय नेते, मंत्र्यांचे राज्यात दौरे वाढले आहेत. राज्यात पक्षाचे नेते सक्रिय झाले आहेत. या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी खोचक शब्दांत टीका केली. तसेच भाजपाच्या नेत्यांचे राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते समजावून सांगण्यासाठी त्यांनी पाण्यातील बोटीची खास स्टोरी सांगितली.

भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना भाजप नेत्यांच्या महाराष्ट्रात वाढलेल्या दौऱ्यांबाबत प्रश्न विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्रात अचानक सक्रिय झाले आहेत. हे खरं आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सारखे येथे येत असतात. आपली बोट बुडेल की काय असं ज्यावेळी वाटायला लागतं त्यावेळी मग सगळेच सक्रिय होतात. मग अशा वेळी सगळ्यांना काम मिळतं. कोण पाणी उपसतं तर कोण बोट दुरुस्त करण्याचं काम करतं. तसं जे आहे त्यामुळे आता हे सगळे कामाला लागले आहेत.

‘फडणवीसांना विसरा पण, बाळासाहेबांना तरी विसरू नका’; ‘त्या’ जाहिरातबाजीवर भुजबळांचा संताप

राज्यात येत आहेत. निवडणूक प्रचाराचा तो भाग आहे. ठीक आहे. त्यांनी यावं. मग आता त्यांनी काय केलं हे सांगावं. काय विकलं हेही सांगावं, असे आव्हानही भुजबळ यांनी दिले.

शेतकऱ्यांची लूट सुरू, कृषी अधिकारी पोलिसांनी कारवाई करावी 

खतांच्या दुकानावर काही ठिकाणी भयंकर लुटालूट सुरू आहे. काही ठिकाणी शंभर रुपये भाव असेल तर काही ठिकाणी दोनशे रुपये भाव आहे. हे असं का होतंय? आम्ही ज्यावेळी कृषी अधिकाऱ्यांना खतांची कमतरता आहे का असे विचारतो त्यावेळी ते सांगतात आम्ही कालच मिटींग घेतली. खतांचा पुरेसा पुरवठा आहे. बाकीचा येईल. मग असे जर असेल तर दुकानदार चढ्या दराने विकतात. ही जी लूटालूट सुरू आहे. त्यावर पोलीस आणि कृषी अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे. शेतकरी आधीच अडचणीत आहे. शेतमालाचे भाव पडलेत. कापसाचे वाटोळे झाले. अशा संकटातून ते ज्यावेळी उभे राहण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी सरकारने त्यांची मदत करावी. मात्र, तसे होताना दिसत नाही अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube