‘या सरकारमध्ये ती क्षमताच नाही, आता मंत्रिमंडळाचा विस्तार’.. बच्चू कडू शिंदे-फडणवीसांवर संतापले
Bacchu Kadu on Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असल्याचे सांगितले जात होते. 19 जूनपर्यंत विस्तार होईल अशीही चर्चा होती. आता मात्र, हा विस्तार 9 जुलै नंतर होईल अशा बातम्या आल्या होत्या. या सगळ्या घडामोडीत मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचा संयम सुटत चालला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे.
कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराला वर्षभर लागेल असे आम्हाला वाटले नव्हते. या सरकारने काही चांगली कामे केली. त्यामुळे मी नाराज नाही. पण, आता 2024 मध्येच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे वाटत आहे. मी यापूर्वीही हा दावा केला आहे. या सरकारमध्ये ती क्षमता नाही, अशा शब्दांत कडू यांनी नाराजी व्यक्त केली.
‘जयंत पाटील भाजपच्या वाटेवर, त्यांचं ‘तेव्हाचं’ रडणं नाटकी’; शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा
कोर्टात जाणार, त्यांना धडा शिकविणार
शिंदे गटावर विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या गद्दार विशेषणांवर कडू यांनी इशारा दिला. आम्हाला गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल. या प्रकरणी मानहानीचा दावा दाखल केला जाईल. आम्ही विकासासाठी त्यांच्यासोबत गेलो. उद्धव ठाकरे माणूस म्हणून खूप चांगले आहेत पण, मुख्यमंत्री म्हणून ते कमी पडले म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे कडू म्हणाले.
विस्तार का लांबला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांवर एक जबाबदारी निश्चित केली आहे. मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघात काम करायचे आहे. त्यामुळे सर्व मंत्री त्याठिकाणी असणार आहेत. तसेच समतोल साधण्याच्या उद्देशानेही सरकारकडून अभ्यास सुरू आहे. त्यानुसार काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. याआधारावरच राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे.
News Arena India Survey : यशोमती ठाकूरांचा किल्ला मजबूत तर रवी राणांची जागा भाजपला
लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन केंद्रातला आणि राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे गटातील तीन मंत्र्यांना केंद्रात मंत्रिपदे मिळू शकतात अशी शक्यता आहे. यामध्ये दोन राज्यमंत्री तर एक कॅबिनेट मंत्रिपदाचा समावेश असेल. त्यासाठी चर्चाही सुरू झाल्याची माहिती आहे.