शिंदेंची नाराजी अन् ऑपरेशन, फडणवीसांच्या भेटीगाठी; शरद पवारांच्या गुगलीने ठाकरे हैराण!

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडतं आहेत. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे शिंदे यांच्या सत्काराने ठाकरे गटातील नेते शरद पवार यांच्यावर नाराज झाले आहेत.
राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यापासूनच धुसफूस सुरू आहे. आता पालकमंत्री पदावरूनही नाराजी उघडपणे समोर आली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जवळीक वाढू लागली आहे. एकनाथ शिंदे मात्र दुर्लक्षित होऊ लागले आहेत. परंतु शिंदे गट आणि भाजपतील नेते सर्व काही ठीक असल्याचेच सांगत आहेत.
एकनाथ शिंदेंची नाराजी जुनीच
एकनाथ शिंदे महायुती सरकार मध्ये नाराज आहेत हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. वेळोवेळी शिंदेंनी आपली नाराजी अप्रत्यक्षपणे उघड केली आहे. भाजपकडून शिंदेंकडे दुर्लक्ष होत असल्याच्या चर्चा याआधी सुद्धा झाल्या होत्या. एकनाथ शिंदे नाराज का आहेत, यामागे नेमकी काय कारणे आहेत याची माहिती घेऊ या..
मुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद मिळाले नाही.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद
शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडी नियुक्तीत उशीर
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय व्यक्ती
शिंदे यांच्या कार्यकाळातील फ्लॅगशिप योजना रोखणे
आपत्ती व्यवस्थापन समितीतून बेदखल केले नंतर पुन्हा घेतले
पालकमंत्री पदावरून वादाची शिंदेंची कबुली
खासदारांनी काय खावं, कुठे जावं ठाकरेच ठरवतात; अदित्य ठाकरेंना शिंदेंचा टोला
शिंदेंनी कुठे कुठे मारली दांडी
याच कारणामुळे शिंदे महायुतीची बैठक असो किंवा कॅबिनेट बैठक असो यातील बहुतांश बैठकीत गैरहजर राहत होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विभिन्न कार्यक्रमांत सातत्याने हजेरी लावत आहेत. शिंदे मात्र असे कार्यक्रम आणि बैठकांतून गायब असतात. त्यांच्या गैरहजेरीने त्यांच्या नाराजीच्या चर्चांना अधिक बळ मिळत आहे. एकनाथ शिंदे दोन कॅबिनेट बैठकांना गैरहजर होते. एका मंत्रिमंडळाच्या बैठकीला ऑनलाईन हजर होते. ठाणे मुंबई डीपीडीसी बैठकीला गैरहजर तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीलाही शिंदे गैरहजर होते.
एकनाथ शिंदे नाराज आहेत ही गोष्ट आता एकदम स्पष्ट झाली आहे. नाराज असतानाही राजकीय दृष्ट्या त्यांना काहीच करता येत नाही. यामागे सुद्धा काही कारणे आहेत. राज्यात भाजप आणि अजित पवार मजबूत स्थितीत आहेत. भाजपचे 132 तर अजित पवार गटाचे 42 आमदार आहेत. बहुमतासाठी भाजपला फक्त 13 आमदारांची आवश्यकता आहे. याच कारणामुळे भाजप शिंदेंची नाराजी गांभीर्याने घेत नसावा अशी चर्चा आहे. त्याऐवजी अजित पवारांची साथ जास्त फायदेशीर असल्याचे काही भाजप नेत्यांना वाटत आहे. शिंदेंना पक्ष फुटण्याचीही भीती वाटत आहे.
यामुळे मागील काही दिवसांपासून शिंदे पक्ष विस्तारावर भर देत आहेत. गाव, शहर, जिल्हा पातळीवर पक्षाचे संघटन अधिक मजबूत करत आहेत. ठाकरे गटातून जितके नेते येत आहेत त्या सगळ्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. मागील दोन महिन्यात ठाकरे गट आणि अन्य पक्षांतून जवळपास 100 नेते आणि पदाधिकारी शिंदेसेनेत दाखल झाले आहेत. गुरूवारी कोकणातील दिग्गज नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला.
फडणवीसांची पुढील रणनीती काय
अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची पुढील रणनीती काय असेल असा प्रश्न उपस्थित होतो आहे. शिंदे गटाच्या वाढत्या दबावापुढे नमते घेणार की अजित पवार यांना प्राधान्य देत शिंदेंना साइडला करणार की शिंदेंना सोबत घेत महायुतीला आणखी मजबूत करणार.. याचा विचार करता आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आताच व्यक्त होत आहे.
जे राहिलेत ते पण येतील; साळवींनंतर ठाकरे गटाला आणखी गळतीचे शिंदेंकडून संकेत
संजय पाटील संमेलनाला हजर, शिंदेसेनेत जाणार?
दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला चक्क ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते. सोशल मीडियावर पोस्ट लिहीत त्यांनीच याचा खुलासा केला होता. यानंतर आता पाटील शिंदे गटात जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्राचा होता म्हणून मी उपस्थित होतो. बाकी काही कारण नाही.
दुसरीकडे शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने ठाकरे गट कमालीचा अस्वस्थ झाला आहे. अनेक नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. काल आमदार आदित्य ठाकरे यांनी तडक दिल्ली गाठली आणि आपल्या 9 खासदारांची भेट घेतली. बैठक घेतली. ही बैठक संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
आपल्या पक्षातील आमदार आणि खासदार शिंदे गटात जाऊ नयेत यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. सातत्याने आमदार खासदारांच्या बैठका घेत आहेत. या ऑपरेशनची धास्ती इतकी आहे की आदित्य ठाकरे यांनी बुधवारी रात्रीच दिल्ली गाठली आणि रात्रीच दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या. यानंतर गुरूवारी त्यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न सुरू असल्याचे यातून दिसून येत आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सुद्धा ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई यांची फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. इतकेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतली.