‘राज ठाकरे विश्वनेते, भाजपाचे पाळीव पोपट बोलू लागले’; संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut vs Raj Thackeray : महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमा दरम्यान झालेल्या दुर्घटने प्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उडी घेत राज्य सरकारचा बचाव केला होता.
कोरोना संकटाच्या काळात ढिसाळ नियोजन झालं होतं. त्यासंदर्भातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज ठाकरे हे विश्वनेते आहेत. भाजपने काही पोपट पाळले असून ते आता बोलत आहेत, अशा शब्दांत त्यांनी खोचक टीका केली.
माझ्याशी खुलेआम चर्चा करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा चॅलेंज…
ते पुढे म्हणाले, भाजपने सध्या एवढे पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांन बोलू द्या. पोपटपंची करू द्या. नोटबंदीच्या रांगेत हजारो लोक मेले हा सदोष मनुष्यवधच आहे. त्यावरही भाजपाच्या पोपटांना बोलायला सांगा. गंगेत हजारो प्रेते वाहून गेली. गुजरातमध्येही स्मशानात जागा नव्हती, मग उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी करावी, असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमातील ढिसाळ नियोजनावर बोला. बाजूलाच मेजवाण्या सुरू होत्या. लोकं तडफडून मेले. त्यांना साधे प्यायलाही पाणी नव्हते. त्यावर बोला. ढिसाळ नियोजनावर बोला. उठसूट उद्धव ठाकरे.. उद्धव ठाकरे सुरू आहे. झोपेत उद्धव ठाकरे आणि जागेपणीही उद्धव ठाकरे दिसत आहे, अशी टीका राऊत यांनी केली.