NCP Crisis : ‘पवार साहेबांना त्रास होतोय’; भेटायला आलेल्या आव्हाडांचे डोळे पाणावले

NCP Crisis : ‘पवार साहेबांना त्रास होतोय’; भेटायला आलेल्या आव्हाडांचे डोळे पाणावले

Jitendra Awhad : ‘पवार साहेबांना त्रास होतोय. हा त्रास कुणामुळे होतोय? तर ज्या लोकांना त्यांनी उभं केलं. आम्ही गेल्या 35 वर्षांत हे सगळं पाहिलंय. मी साक्षीदार आहे. जे आज तिकडे बसून बोलताहेत ना त्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आलेत ना, ते आणणारा एकच माणूस आहे ते म्हणजे शरद पवार. ज्या माणसानं पक्ष तयार केला त्याच माणसाला आज सांगितलं जात आहे की पक्ष आमचा आहे’, असं सांगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे डोळे पाणावले.

मला या गोष्टीचं दुःख होत आहे की त्यांचं वय 84 वर्षे आहे. ते 2009 पासून सत्तेत नाहीत. मात्र तिकडे गेलेल्या प्रत्येकाला खुर्ची मिळावी म्हणून शरद पवार लढले. आज तेच लोक शरद पवारांची खुर्ची हिसकावत आहेत. ज्या माणसाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यालाच हे लोक सांगत आहेत की पक्ष आमचा आहे.

आमदार आव्हाड शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे निघाले होते. त्याचवेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला. त्यावेळी आव्हाड म्हणाले, ‘मी साहेबांचं दर्शन घ्यायला आलो आहे. मी काही नवीन नाही येथे. मी कुठेही जाणारा माणूस नाही. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कशाला एवढे धावतपळत माझ्या मागे येताय?’, असा सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाच विचारला.

अजितदादांचं बंड होणार हे माहित होत पण… रोहित पवारांनी केला गौप्यस्फोट

ते पुढे म्हणाले, ‘जेथे स्वार्थ असतो तिथे भांडणे होतातच. आम्हाला आमच्या 35 वर्षांच्या राजकारणात काहीच मिळालं नाही तरीही आम्ही आमच्या बापासोबत आहोत. पवार साहेबांनी अशा खूप लढाया लढल्या आहेत. ज्या ज्या वेळी पवार साहेबांना घेरलं गेलं. त्या प्रत्येक वेळी पवार साहेब त्या घेऱ्यातून बाहेर येऊन मजबुतीने उभे राहिले. राज्यात जे काही राजकीय नाट्य झालं आहे ते सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. त्यामुळे जनताच आता काय ते उत्तर देईल’, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीतील नाट्यावर नाराजी व्यक्त केली.

वज्रमुठीबाबत मला माहिती नाही 

सध्याच्या राजकीय परिस्थितीत आता महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा होतील का, या प्रश्नावर आव्हाड म्हणाले, ‘वज्रमूठ सभेबाबत मला सध्या काहीच माहिती नाही. मी माझ्या कामात व्यस्त होतो. पवार साहेब दिसले नाहीत म्हणून मी त्यांना सहज भेटायला आलोय. मी साहेबांना कधीही न सोडणारा माणूस आहे.’

अखेर पवारांनी हत्यार उपसलं; ज्यांनी द्रोह केला त्यांनी मी जीवंत असेपर्यंत…

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube