Maharashtra Politics : उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार?; धुसफूस, पेच अन् सस्पेन्स…

Uddhav Thackeray राज्याच्या सत्ताकारणातील संघर्षाचा एक हाय-व्होल्टेज अंक आगामी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने लिहिला जाणार आहे.

  • Written By: Published:
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार?; धुसफूस, पेच आणि सस्पेन्स कायम...

Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील संघर्षाचा एक हाय-व्होल्टेज अंक आगामी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने लिहिला जाणार आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपत असतानाच, निवडणूक आयोगाने जाहीर 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक केवळ कागदावरच्या जागांसाठी नाही, तर उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाचा आणि महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ ऐक्याचा खरा लिटमस टेस्ट ठरणार आहे. विशेषतः संख्याबळाची जुळवाजुळव करताना मित्रपक्षांची भूमिका आणि सत्ताधारी महायुतीची रणनीती यामुळे हा राजकीय आखाडा अत्यंत चुरशीचा झाला आहे.

ब्रेकिंग : विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर; वाचा सविस्तर कार्यक्रम

उद्धव ठाकरे पुन्हा रिंगणात की नवा चेहरा?

राजकीय वर्तुळात सध्या सर्वात मोठा सस्पेन्स हा आहे की, उद्धव ठाकरे स्वतः पुन्हा एकदा विधान परिषदेची पायरी चढणार की ‘मातोश्री’वरून एखादी मोठी चाल खेळणार? 13 मे रोजी ठाकारेंचा कार्यकाळ संपत आहे, मात्र, संख्याबळाची जुळवाजुळव करताना मित्रपक्षांची मिळणारी ‘कच्ची’ साथ आणि सत्ताधारी महायुतीची ‘घेराबंदी’ करण्याची रणनीती यामुळे ठाकरेंचा मार्ग सुकर असेल की काटेरी, याबाबत कमालीची उत्कंठा आहे.

संख्याबळाचे चौरस गणित आणि विजयाचा कोटा

विधान परिषद निवडणुकीसाठी एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानसभेतील सध्याच्या बलाबलानुसार सध्या महायुतीत भाजप (131), एकनाथ शिंदेंची शिवसेना (57) आणि अजित पवारांची राष्ट्रवादी (40) असे एकत्रित संख्याबळ पाहता, महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.

तर, महाविकास आघाडीत (MVA) शिवसेना (UBT), काँग्रेस आणि शरद पवार गटाचे मिळून एकूण संख्याबळ 46 आहे. या जोरावर महाविकास आघाडीचा केवळ एकच उमेदवार सुरक्षितपणे निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे, जी जुळवणे सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणात मोठे आव्हान आहे.

मोदी सरकारने महिला आरक्षणाबाबची अधिसूचना मध्यरात्री का काढली? समजून घ्या सोप्या भाषेत

उद्धव ठाकरेंची उमेदवारी : पक्षाचा आग्रह आणि राजकीय प्रतिष्ठा

2020 मध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा विधान परिषदेवर प्रवेश केला होता. आता पक्षातील नेत्यांचा असा आग्रह आहे की, उद्धव ठाकरेंनीच पुन्हा ही जबाबदारी स्वीकारून विधान परिषदेचे नेतृत्व करावे. जर ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर भाजप ही निवडणूक बिनविरोध करण्याकडे कल देऊ शकते. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याची परंपरा अनेकदा पाळली गेली आहे. मात्र, जर मविआने दोन जागांचा हट्ट धरला, तर ही निवडणूक अधिक चुरशीची होऊ शकते. Vidhan Parishad Election 2026

काँग्रेस आणि शरद पवार गटाची भूमिका अन् समन्वयाचा पेच 

ठाकरेंच्या नावामुळे काँग्रेसची काहीशी अडचण झाली आहे. यापूर्वी राज्यसभेच्या वेळी शिवसेनेने शरद पवारांसाठी जागा सोडली होती, त्यामुळे आता विधान परिषदेसाठी ठाकरे गट मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यसभेत त्याग केल्यामुळे आता विधान परिषदेसाठी ठाकरेंना प्राधान्य देण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. परंतु, जर ठाकरे स्वतः उमेदवार नसतील, तर त्या जागेवर काँग्रेसने आपला हक्क सांगावा. राजीव सातव यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन सपकाळ यांनी फडणवीसांना केले आहे.

Nashik TCS Case : नाशिक धर्मांतरण प्रकरणात ट्विस्ट; निदा खान ‘HR’ नव्हतीच? वकिलांचा दावा

उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार का?

आता उद्धव ठाकरे आमदार होणार की नाही, हे प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या अंतर्गत समन्वयावर अवलंबून आहे. मविआकडे असलेल्या ४६ मतांच्या जोरावर उद्धव ठाकरे सहजपणे निवडून येऊ शकतात. काँग्रेस आणि शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा जाहीर केलाच आहे. अडचण केवळ एकाच जागेची आहे – जर काँग्रेसनेही आपल्या स्वतंत्र जागेसाठी आग्रह धरला, तर मतांची विभागणी होऊन पेच निर्माण होऊ शकतो.

परंतु, पोटनिवडणुकीची जागा जर काँग्रेसला मिळाली आणि मुख्य ९ जागांपैकी सुरक्षित असलेली एक जागा उद्धव ठाकरेंना देण्यात आली, तर हा मार्ग अत्यंत सुकर होईल. भाजप देखील उद्धव ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देता ही जागा बिनविरोध सोडून राजकीय सौजन्य दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाकरेंचा ‘प्लान बी’ काय?

जर उद्धव ठाकरेंनी स्वतः आमदार न होण्याचा निर्णय घेतला, तर शिवसेना (UBT) कडून अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यात विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाच्या फायर ब्राँड नेत्या सुषमा अंधारे, पक्षाचे निष्ठावान माजी खासदार विनायक राऊत व राजन विचारे यांच्यासह कोकणातील पक्षाचा महत्त्वाचा चेहरा असलेले वैभव नाईक आणि युवा सेनेचे सचिव आणि ठाकरेंचे विश्वासू सहकारी सूरज चव्हाण यांच्यापैकी एकाला संधी दिली जाण्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीकडे केवळ ४६ मते असताना एका सुरक्षित जागेसाठी चढाओढ सुरू आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेमुळे ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेत असलेल्या काँग्रेसनेही आता शड्डू ठोकला आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंना निवडून आणण्यासाठी मविआला आपल्या हक्काच्या दुसऱ्या जागेचा बळी द्यावा लागेल की, भाजपच्या रणनीतीला छेद देऊन एखादा चमत्कार घडवावा लागेल? हे महत्त्वाचे आहे.

उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या मविआकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यांच्या निवडीमुळे मविआला सभागृहात एक वजनदार नेतृत्व मिळेल. सत्तेच्या या ‘ग्रँड फिनाले’मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा आमदार म्हणून सभागृहात गर्जणार की किंगमेकरच्या भूमिकेत राहून नव्या शिलेदाराला संधी देणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. जर ठाकरेंनी ही संधी डावलली आणि पक्षातील दुसऱ्या नेत्याला संधी दिली, तर ठाकरे गटात अंतर्गत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 12 मे चा निकाल केवळ 9 जागांचा नसून, तो आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील शक्तीप्रदर्शनाचाही ट्रेलर असणार आहे.

follow us