‘राजकारणासाठी औरंगजेब पाहिजे हे तुमच्या हिंदुत्वाचं दु्र्दैवच’; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

‘राजकारणासाठी औरंगजेब पाहिजे हे तुमच्या हिंदुत्वाचं दु्र्दैवच’; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Sanjay Raut : कोल्हापूर येथे काल झालेल्या दगडफेकीच्या घटनेवरून राजकारण तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अचानक औरंगजेबाच्या इतक्या औलादी कुठून पैदा झाल्या त्याचा शोध घ्यावा लागेल, असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार पलटवार केला आहे. राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी औरंगजेब लागतोय हे तुमच्या तथाकथित हिंदुत्वाचं दुर्दैव आहे. तुमचं गृहखातं फेल आहे. औरंगजेबाच्या इतक्या औलादी कशा पैदा झाल्या हा प्रश्न फडणवीसांनी आधी स्वतःला विचारला पाहिजे. राज्याच्या कानाकोपऱ्यात काय चाललंय याची माहिती आहे. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही सांगूनही तुम्ही काही करत नाही. कायदा आणि पोलीस यंत्रणा त्रास देण्याकरता वापरत आहात. तुम्ही गुंडांच्या मुसक्या बांधत नाही. तुम्ही अत्याचारी लोकांना वाचविण्यासाठी यंत्रणांचा वापर करत आहात. बाकी तुम्ही करता काय? असा सवाल राऊत यांनी केला.

फडणवीस तुम्ही इतके हतबल का ? 

आमचे राजकीय मतभेद असू शकतील पण, तुमच्या क्षमतेविषयी आम्हाला कल्पना आहे की तुम्ही काय करू शकता. राज्याचे मुख्यमंत्री असताना आपण काय काम केलं ते माहिती आहे. पण आपण गृहमंत्री असताना इतके हतबल का झालात मला तर वाटतं फडणवीसांनी गुडघेच टेकले आहेत.

हिंदुत्वाच्या नावावर तणाव निर्माण करण्याचे धंदे 

तुमचं हिंदुत्व इतकं कमजोर आहे का की कुणी नुसते फोटो दाखवले तर दंगली घडतात. करा ना अटक. का कारवाई करत नाही तुम्ही. आगामी काळातील लोकसभा, विधानसभा निवडणुका तसेच सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्यावरुन निर्माण होणारी परिस्थिती यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या नावावर तणाव निर्माण करण्यासाठी तुम्ही औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढताय हे धंदे बंद करा यातून महाराष्ट्राचं नुकसान होतय.

महाराष्ट्रामध्ये जे सररकार आहे त्या सरकारला दंगली हव्या आहेत. या राज्यात दंगली घडविण्याचे खूप मोठं कारस्थान सुरू आहे. भाजप जरी समोर वेगळा चेहरा घेऊन उभा असला तरी त्यांच्या पाठीमागे ज्या यंत्रणा आहेत त्या कशा पद्धतीने काम करतात हे आम्ही गेल्या 25 वर्षांत पाहिले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आणि राजकारणाची सूत्रे आपल्याला हातात ठेवण्यासाठी हे कोणत्या थराला जातात हे आम्ही पाहिले आहे. आता तर त्यांना एक नवीन जोडीदार मिळाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube