Maratha Agitation : पोलीस फोर्स हटवला; तणावपूर्ण शांततेत मनोज जरांगेंचे आंदोलन पुन्हा सुरु
जालना : आम्ही चार दिवसांपर्यंत तुमचा अन्याय सहन करत होतो, पण कालचा प्रकार गंभीर घडला. पण त्यानंतरही आम्ही शांततेत आंदोलन करु आणि आता तर आरक्षण घेऊनच आंदोलन थांबवू, असा निर्धार करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन पुन्हा सुरु केले आहे. अंतरवाली सराटी गावातून सध्या पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, आज (2 सप्टेंबर) स्वराज संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोनलस्थळी भेट दिली. दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. (Maratha agitator Manoj Jarange Patil resumed the agitation in Antarwali Sarati village)
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, काल घडलेला प्रकार आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही. आमचे गाव संपूर्ण माळकरी आहे. अत्यंत शांततेत हे आंदोलन सुरु होते. गृहमंत्री म्हणतात आमच्या पोलिसांना मारलं, आहो साहेब ही जनता तुमची आहे. या जनतेला मारायला नव्हते पाहिजे. हा केवळ आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज नाही, संपूर्ण मराठा समाजावर झालेला हल्ला आहे. याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. तुम्ही दोघेही जनतेच्या मनातून उतरला आहात. आता ज्यांनी काल हल्ला केला त्या सर्वांवर बडतर्फीची कारवाई सरकारने केली पाहिजे, केवळ निलंबन करुन चालणार नाही. तसंच मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या, तरंच तुम्ही खानदानी मराठा आहात, असं म्हणू, असंही जरांगे पाटील म्हणाले.
शरद पवार घेणार आंदोलकांची भेट :
दरम्यान, जखमी आंदोलकांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज (2 सप्टेंबर) जालन्याला जाणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास पवार औरंगाबाद विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास अंबड रुग्णालय आणि वादीगोदरी रुग्णालयाला भेट देतील. त्यानंतर आंदोलन सुरु असलेल्या अंतरवली सराटी गावाला देखील भेट देणार आहेत. तिथून राजेश टोपे यांच्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यावर त्यांची पत्रकार परिषदही होणार आहे.
‘लाठ्या-काठ्यांची भाषा बंद करा, राजीनामा द्या’; संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चाचा संताप :
मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात पाय ठेवल्यास त्यांचा तीव्र विरोध करू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे. तर सरकारने लाठ्या काठ्यांची भाषा बंद करावी, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिला आहे.
नेमकं काय घडलं होतं ?
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू झाले होते. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या तालुक्यातील वीस ते बावीस गावांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला होता. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अनेक गावांतही बंद पुकारण्यात आला. येथील तरुणांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ सराटी गावांत दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यांनी घेतली होती. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधला होता. परंतु जरांगे यांनी उपोषण मागे घेतले नाही. शुक्रवारी अनेक गावांतून पाठिंबा वाढू लागला होता. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. तर पोलिसांनी प्रत्युत्तरात जोरदार लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. यात काही पोलिस आणि आंदोलनकर्तेही जखमी झाले आहे.