‘मी आज शपथ पूर्ण केली, निर्णयांची अंमलबजावणीही होणार’; CM शिंदेंकडून जरांगेंचं कौतुक
Maratha Reservation : ‘मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला गोरगरीब मराठा समाजाच्या वेदनांची जाणीव आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची शपथ मी घेतली होती. आज ती शपथ पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करतोय. दिलेला शब्द पाळणं ही माझी कार्यपद्धती आहे. सरकारने आज जे काही निर्णय घेतले आहेत त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम सरकार करणार आहे’, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजबांधवांना आश्वासन दिले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे वाशी येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मनोज जरांगे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, आमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले, ‘मराठा समाज न्याय हक्क मागताना अन्य कुणाला त्रास होणार नाही याची काळजी समाजाने घेतली. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा. मला गरीब मराठा समाजाच्या वेदनांची जाणीव आहे. म्हणून मी जाहीर शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचे काम शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं ही माझी कार्यपद्धती आहे. आज आमचे गुरू आनंद दिघेंची जयंती सुद्धा आहे. बाळासाहेबांची जयंती 23 ला झाली. या दोघांचा आशिर्वाद आणि समाजाच्या शुभेच्छा पाठिशी आहेत.’
Manoj Jarange : मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या? यादीच आली समोर..
‘आज आमचं सरकार हे तुमचं सरकार आहे. सर्वसामान्यांचं सरकार आहे. आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले. सामान्यांना न्याय देणारे निर्णय सरकारने घेतले. मराठा समाजाने अनेकांना मोठं केली. पदे दिली. परंतु, समाजाला न्याय देण्याची संधी आली तेव्हा संधी द्यायला हवी होती. मात्र तसं झालं नाही’, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.
‘मला जरांगेंनी सांगितले. आमच्या मागण्या मान्य केल्या आता तुम्ही इथे यायला पाहिजे. म्हणून मी येथे आलो. मी आपल्या प्रेमापोटी येथे आलो. कुणबी नोंदी मराठवाड्यात दिल्या जात नव्हत्या. पण आता नोंदी सापडत आहेत. आपलं सरकार देणारं आहे घेणारं नाही. सर्वसामान्य माणूस जरांगेंच्या मागे आपण उभे राहिलात. सामान्य माणूस जेव्हा नेतृत्व करतो त्या आंदोलनाचे एक वेगळेपण असते’, अशा शब्दांत त्यांनी मनोज जरांगे यांचं कौतुक केलं.
Maratha Reservation : ‘मनोज जरांगे लढ्यात जिंकले पण, तहात हरले’ ओबीसी नेत्याने स्पष्टच सांगितलं
सरकार निर्णयांची अंमलबजावणी करणार
‘जे निर्णय आज घेतले आहेत. आपली मागणी आरक्षण मिळेपर्यंत समाजाला ओबीसी सवलती दिल्या जातील. आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही. नोकऱ्या देणार आहोत. या सरकारने घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी करेल हा शब्द मी देतो.’