जीआरमधील ‘तीन’ शब्दांमुळे अडले मराठा आरक्षण; जरांगे पाटलांचे उपोषण सुरुच राहणार!

जीआरमधील ‘तीन’ शब्दांमुळे अडले मराठा आरक्षण; जरांगे पाटलांचे उपोषण सुरुच राहणार!

जालना : सरकारने जीआर काढला, त्यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील’ असं म्हंटलं आहे. पण यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी असतील’ हे तीन शब्द काढून टाका आणि ‘सरसकट मराठा समाजाला’ कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी त्यात दुरुस्ती करा, अशी आमची मागणी आहे. तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार आहे, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर केली. आंतरवाली सराटी येथील आंदोलन स्थळावरुन त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. (Maratha reservation protestor Manoj Jarange Patil held a press conference at Antarwali Sarati)

काय म्हणाले जरांगे पाटील?

सरकारने काल एक निर्णय घेतला. यानुसार, ज्यांच्याकडे वंशावळ आहे त्यांना आजपासून कुणबी प्रमाणपत्र देतो, असे सांगितले आहे. यातून आपल्या मागण्यांपैकी एक महत्वाची मागणी मान्य झाली आहे. पण आमची मुख्य मागणी आहे की, सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ही आहे. कारण आमच्याकडे कोणाकडेही वंशावळीच्या नोंदी असलेल्या पुरावे नाहीत. त्यामुळे याचा आम्हाला एक टक्काही फायदा होणार नाही. दुसीर गोष्ट म्हणजे ज्याच्याकडे वंशावळ आहे त्याला सरकारकडे कशाला जावे लागेल, तो तहसिलदार ऑफिसला जाऊन जात प्रमाणपत्र काढेल. त्यासाठी जीआरची गरज नाही.

पण निर्णय घेण्यासाठी धाडस लागत आणि ते धाडस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात आहे. त्यामुळे आम्ही राज्य सरकारच्या अध्यादेशाचं स्वागत करतो. सरकारचा निर्णय चांगला आहे. मात्र त्याचा आम्हाला काहीही फायदा होणार नाही. याचा अर्थ आम्ही अडवणूक करतो असं नाही. ही अडवणूक प्रशासनाकडून होत आहे. निर्णयात फक्त थोडी सुधारणा करा, हीच आमची मागणी आहे.  ‘ज्यांच्याकडे वंशावळी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी असतील’ हे तीन शब्द काढून टाका आणि ‘सरसकट मराठा समाजाला’ कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी त्यात दुरुस्ती करा, अशी आमची मागणी आहे.

जरांगेंनी सांगितला पुढचा प्लॅन :

दरम्यान, सरकारच्या जीआरनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुढील प्लॅन काय आहे ते स्पष्ट केले. ते म्हणाले की, उद्या 123 गावातील प्रतिनिधीसोबत बैठक होणार आहे. सर्व समन्वयक लोकांशी चर्चा करणार आहे. आम्हाला सरकारचा निरोप आला आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार आहेत. ज्याकडे वंशावळी आहेत, त्यांना उद्यापासून कुणबी प्रमाणपत्रे दिली जातील असे सांगण्यात आले आहे. मात्र चर्चा करुन आम्ही पुढील निर्णय घेऊ.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube