नांदेडमधील काँग्रेस अशोक चव्हाणांनी शून्यावर आणली, ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
नांदेड : माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला होता. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.अशातच चव्हाण यांच्यानंतर नांदेडमधील 55 माजी नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळं कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. (Nanded News)
भाजप घर आणि पक्ष फोडतेच, पण आता विद्यार्थ्यांचे पेपरही फोडतेय; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र
चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. चव्हाण यांच्यासोबत अनेकजण जातील, असेही मानले जात होते. मात्र आम्ही काँग्रेससोबतच राहू असा दावा काहींनी केला होता. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर चव्हाण शुक्रवारी प्रथमच नांदेडमध्ये आले. त्यानंतर आज त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या ५५ निर्वाचित व स्विकृत नगरसेवकांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याची माहिती स्वत: अशोक चव्हाण यांनी ट्विट करून दिली आहे.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
या पक्ष प्रवेशाबाबत विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी याविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की, अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या ५२ माजी नगरसेवकांनी त्यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दिला होता. चव्हाण यांचे नांदेडला आगमन झाल्यानंतर कालपासून अनेक नगरसेवकांनी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तर, काही नगरसेवकांनी आज झालेल्या एका बैठकीत भाजपला समर्थन देत असल्याचे जाहीर केले. चव्हाण यांच्या उपस्थितीतच या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आतापर्यंत निवडून आलेले व स्विकृत मिळून एकूण ५५ नगरसेवक भाजपमध्ये सामिल झाले आहेत. नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या मागील निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ८१ पैकी ७३ नगरसेवक निवडून आले होते. पुढील काळात त्यातील आणखी काही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही सूतोवाच अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे.