ती तुझी नाही माझी झाली; बीडच्या केज तालुक्यात एकजणाला मारहाण

या प्रकरणी पतीने पोलिसांत धाव घेतली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

News Photo   2026 04 26T140031.158

बीडमध्ये गुन्हेगारी घटना वाढल्याचे चित्र आहे. आता केज तालुक्यातील शिंदी फाटा परिसरातून धक्कादायक घटना आहे. पत्नीला फोन केला म्हणून पतीलाच लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण झाली. या प्रकरणी पतीने पोलिसांत धाव घेतली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, विडा येथील पंकज दादाराव वाघमारे हे गुरुवारी सकाळच्या सुमारास शिंदी फाट्याजवळील एका दुकानासमोर बसले होते. त्याचवेळी आरोपी दीपक उत्तम वाघमारे आणि त्याचा साथीदार प्रेम (पूर्ण नाव अज्ञात) हे दोघे पाठीमागून येत त्यांनी पंकज यांना अचानक गाठले.

तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, बीड कारागृहात चाललय काय?

यावेळी दोघांनीही पंकज यांच्याशी वाद घालत, त्यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. ‘ती आता तुझी नसून माझी आहे’ असे म्हणत त्यांनी पंकज यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर आणि मांडीवर वार केले, तसेच डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले.

हल्ल्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी पंकज यांना पुन्हा पत्नीला फोन केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे जखमी अवस्थेत असलेल्या पंकज यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सहाय्यक अधिकारी हनुमान मुंडे पुढील चौकशी करत आहेत. कौटुंबिक वादातून उद्भवलेल्या अशा प्रकारच्या हिंसक घटनांमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.

follow us