शरद पवारांचे दुसरे लक्ष्य धनंजय मुंडे! येवल्यानंतर बीडच्या मैदानात शड्डू; संदीप क्षीरसागरांकडे जबाबदारी
बीड : नाशिकनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दुसरी सभा बीडमध्ये होणार आहे. 17 ऑगस्टला त्यांची ही सभा पार पडणार आहे. या सभेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी जिल्ह्यातील शरद पवार यांच्यासोबत असलेले एकमेव आमदार संदीप क्षीरसागर यांना देण्यात आली आहे. या निमित्ताने आता पवार येत्या काळात छगन भुजबळा यांच्यापाठोपाठ धनंजय मुंडे यांच्याविरोधात वातावरण तापविताना दिसून येणार आहेत. (After Nashik, NCP President Sharad Pawar’s second Rally will be held in Beed)
याबाबत लेट्सअप मराठीशी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले, मला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून सुचना मिळाली आहे, येत्या 17 ऑगस्टला बीडमध्ये आपल्याला शरद पवार यांची सभा घ्यायची आहे. त्यानुसार आम्ही शरद पवार यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्वांनी सभेची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यातील इतर आमदार जरी अजित पवार यांच्यासोबत गेले असले तरीही लोकं शरद पवार यांना मानणारे आहेत. त्यामुळे सभेसाठी मोठ्या संख्येने लोकं येतील, असा आशावादही क्षीरसागर यांनी बोलताना व्यक्त केली.
बीड जिल्हा हा सुरुवातीपासूनच शरद पवार यांच्यासोबत चालणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अगदी समाजवादी काँग्रेसच्या काळातही जिल्ह्यातील सातही आमदार विजयी झाले होते. पुढे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही जिल्हा पवारांसोबत होता. अनेक मातब्बर घराणी राष्ट्रवादीसोबत आली. यातून विमल मुंदडा, सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर अशी मंडळी आमदार झाले. आताही जिल्ह्यातील 6 पैकी 4 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्यातील हक्काचा बालेकिल्ला म्हणून बीडकडे पाहिले जाते.
कोण कोणासोबत?
आता जिल्ह्यातील चार पैकी धनंजय मुंडे, प्रकाश सोळंखे, बाळासाहेब आजबे हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. तर माजी आमदार अमरसिंह पंडित, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाणांचा हे अजित पवार यांच्याबाजूने गेले आहेत. दुसऱ्या बाजूला संदीप क्षीरसागर शरद पवार यांच्यासोबत कायम आहेत. तर माजी आमदार उषा दराडे यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हेही शरद पवार यांच्याच बाजूने उभारले आहेत.
नाशिकमध्ये घेतली होती पहिली सभा :
अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी हार न मानता आपण जनतेच्या दरबारात जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं अन् शक्तिप्रदर्शन करत लढाऊ बाणा दाखवून दिला. त्यानंतर त्यांची नाशिकमध्ये पहिली सभा पार पडली. तर आता 17 ऑगस्टपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून यातील दुसरी सभा बीडमध्ये होणार आहे.