आष्टी-पाटोदा-शिरूरच्या पाण्यासाठी एल्गार; धोंडे-आजबेंच्या नेतृत्वात जल आक्रोश मोर्चा
Beed Protest March : आष्टी-पाटोदा-शिरूरच्या पाण्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर उतरला आहे. बीडमध्ये जल आक्रोश मोर्चा काढला.
आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांच्या (Ashti) पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं आणि वर्षभरात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे. समुद्रात वाहून जाणारं पाणी अडवून त्यातून या तीन तालुक्यांना प्राधान्याने पाणी द्यावं, अशीही मागणी त्यांनी केली. शासनानं या प्रश्नाची तातडीनं दखल घेतली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धोंडे यांनी दिला.
आष्टी-पाटोदा-शिरूरच्या पाणीप्रश्नासह दुष्काळी उपाययोजनांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोमवारी दि. 28 रोजी बीड शहरातील चहऱ्हाटा फाटा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले. बैलगाड्यांचा सहभाग हे या मोर्चाचं विशेष आकर्षण ठरलं असून धोंडे आणि आजबे यांनीही बैलगाडीतून मोर्चात सहभाग घेतला.
नगर रोडमार्गे निघालेल्या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला आणि तिथं त्याचं सभेत रूपांतर झालं. पाण्याच्या हक्कासाठी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचं लक्ष वेधलं. मोर्चानंतर धोंडे, आजबे यांच्यासह शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन दिलं. हे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात आमदार सुरेश धस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा जाणता राजा म्हणून उल्लेख
यावेळी माजी आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, काकासाहेब शिंदे, विश्वनाथ नागरगोजे, दीपक घुमरे, वनवे दादा, भाऊसाहेब लटपटे, संतोष जाधव, नियामत बेग, सतीश झगडे, भाऊसाहेब भराटे, गुलाबराव घुमरे, अशोकराव साळवे, रेश्मा पवळ, वैभव बडे, अशोकराव दहिफळे, विष्णुपंत घोलप, संतोष चव्हाण आणि शामराव हुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. मोर्चातून आष्टी, पाटोदा आणि शिरूरच्या पाणीप्रश्नावर तातडीनं निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
उजनी धरणातून थेट पाइपलाइनद्वारे आष्टी तालुक्याला पाणी देण्याच्या योजनेला आपण आमदार असताना मंजुरी मिळवून टेंडर प्रक्रिया पूर्ण केली होती, असा दावा बाळासाहेब आजबे यांनी केला. मात्र, सत्ता बदलाच्या काळात विद्यमान आमदारांनी तक्रार केल्यानं या योजनेचं काम रखडलं, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे एक ते दोन वर्षांचा महत्त्वाचा कालावधी वाया गेला आणि मतदारसंघाला हक्काचं पाणी मिळण्यास विलंब झाल्याचं आजबे म्हणाले.
दरम्यान, मोर्चात सहभागी न होण्याबाबत आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर भीमराव धोंडे यांनी प्रत्युत्तर दिलं. चांगल्या कामात खोडा घालण्याची सवय असल्याची टीका करत धोंडे यांनी या पाणीप्रश्नावरील निर्णयाचं स्वागत करून मोर्चात सहभागी व्हायला हवं होतं, असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राची केवळ प्रत प्रसिद्ध करण्यात आली असून प्रत्यक्ष मंजुरी कुठं आहे, असा सवालही त्यांनी केला. समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याबाबत अद्याप कोणताही डिटेल सर्व्हे झालेला नसल्याचा आरोप करत या प्रश्नावर शासनानं तातडीनं ठोस पाऊल उचलावं, अशी मागणी त्यांनी केली.