दारुच्या नशेत वडिलांवर जीवघेणा हल्ला, बीड जिल्ह्यातील थरारक घटना

या संपूर्ण प्रकारानंतर आरोपीने वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.

Bbeedd

बीडमध्ये गुन्हेगारी घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. जिल्ह्यातील लक्ष्मीआई तांडा परिसरातून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने वडिलांवरच कोयत्याने हल्ला केला. तसंच गाडीची तोडफोड करत चिमुकल्या मुलीलाही फेकून दिलं. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत राजू दगडू पवार यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचा मोठा मुलगा सचिन हा मद्यपानाच्या व्यसनामुळे वारंवार घरात वाद घालत असतो. 13 एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो दारू पिऊन घरी आला आणि लहान भाऊ नितीनची दुचाकी घेऊन जाण्याचा आग्रह करू लागला. त्याची अवस्था पाहून वडिलांनी त्याला नशेत वाहन चालवण्यास मनाई केली.

वडिलांनी दुचाकी घेऊन जाण्यास नकार दिल्याने नशेत असलेल्या सचिनचा पारा चढला. त्याने घरातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने शिवीगाळ करत नितीनची दुचाकी खाली पाडून दगडाने तिची तोडफोड केली. त्यानंतर वडिलांच्या दुचाकीचेही नुकसान केलं. या प्रकाराबाबत वडिलांनी विचारणा केली असता, त्याचा राग अधिकच भडकला आणि त्याने कोयता उचलून वडिलांच्या डोक्यावर तसंच हातावर वार केले. या हल्ल्यात राजू पवार गंभीर जखमी झाले.

राजू शेख झाला अजय म्हस्के; बीडच्या तरुणाने पालघरच्या महिलेला कसं फसवलं?

घटनेदरम्यान घरातील इतर सदस्यांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने कोणाचाही विचार न करता हिंसक वर्तन सुरूच ठेवलं. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भावालाही त्याने चावा घेतला. याशिवाय घरातील महिलांनाही मारहाण करण्यात आली. संतापाच्या भरात त्याने लहान मुलगी कोमल हिला उचलून फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घरातील सोफा व इतर साहित्याचीही तोडफोड करण्यात आली.

या संपूर्ण प्रकारानंतर आरोपीने वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. जखमी राजू पवार यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे.

follow us