संभाजीनगरच्या सभेतून बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या हुकुमशाहीविरोधात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. सगळे मित्रपक्ष या यात्रेत सहभागी झाले आणि यशस्वी पदयात्रा झाली. पदयात्रेतून महागाई, बेरोजगारीच्या मुद्दे मांडले गेले. लोकांना यावर जागृत केले गेले. राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी आणि मोदींचा संबंध काय असा सवाल केला पण त्यांचं भाषण काढून टाकण्यात आले. परदेशात गेल्यावर इथल्या लोकशाहीबद्दल काळजी व्यक्त केली होती पण गुजरातमध्ये एक केस चालवली आणि त्यांची खासदारकी रद्द केली. अदानीच्या खात्यात 20 हजार कोटी कसे जमा झाले? असा सवाल राहुल गांधी केला होता. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत पण विरोधी नेत्यांचा खासदारकी रद्द करत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेतून केला.
ते पुढं म्हणाले, आज देशातील परिस्थिती काय आहे. जो कोणी विरोधात बोललं त्यांच्या घरी ईडी जाऊन पोहचते, चौकशा सुरु होतात, पोलीसांचा ससेमिरा सुरु होतो. कोणीच विरोधात बोलायचे नाही. अशा पद्धतीने केंद्र आणि राज्य सरकार वागत आहे, असा टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
कांद्याला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही यासाठी आम्ही विधानसभेत आंदोलन केले. त्यावेळी नाफेडकरुन कांदा खरेदीचं अश्वासन देले होते पण अजूनही कांदा खरेदी केली जात नाही. शेतकऱ्यांना रुपया देखील मिळत नाही, अटी घालून ठेवल्या. अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली अजून कोणताही निर्णय नाही. जाहीर मात्र भरपूर केलं, असा टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
सभा होऊ नये म्हणून पोलिसांवर नागपूरचा दबाव; चंद्रकांत खैरेंचा आरोप
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला आम्ही सात मंत्री होतो. त्यामध्ये पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा केला. मागच्या सरकारने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी केली पण त्यामध्ये 65 रकान्याचा फॉर्म भरावा लागत होता. सहकुटुंब लोकांना सेतु केंद्रावर जावं लागतं होतं. त्यामध्ये कोणाला कर्जमाफी मिळाली कोणाला मिळाली नाही. आम्ही कर्जमाफी केली त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी हे नाव महाराष्ट्रातील जनतेच्या मनात कोरले गेले आहे. महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कालखंड ऐतिहासिक आहे, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
कोरोनाच्या काळात आपण ज्या पद्धतीने हे संकट हाताळले त्यामुळे देशात देखील आपला लौकिक वाढला. देशात सर्वांत चांगलं संकट महाविकास आघाडीने हाताळले, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आपल्याशी बोलत होते त्यावेळी लोकांना वाटायचे आपल्या घरातील व्यक्ती आपल्याशी बोलतोय, असे त्यांनी सांगितले.