“53 दिवसांपासून संकट, मला जाणूनबुजून टार्गेट केलं, माझा राजीनामा..”, धनंजय मुंडेही आक्रमक
Dhananjay Munde : ‘माझ्यावर संकट काही आज आलेलं नाही. आज 53 वा दिवस आहे. मला टार्गेट करून एक मिडिया ट्रायल चालवलं जात आहे. या काळात मी अवाक्षरही बोललेलो नाही. स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे.’ अशा शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. भगवानडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीनंतर मुंडेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुंडे पुढे म्हणाले, ‘माझ्यासारख्या अतिशय सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं हा गड उभा आहे असे बाबांनी सांगितले याच्यासारखी शक्ती आणि विश्वास माझ्या पाठीशी उभा करणं ही फार मोठी जबाबादारी आहे. संकटाच्या काळात हा गड माझ्या पाठीमागे उभा आहे ही फार मोठी शक्ती आहे. संकट 53 दिवसांचं होतं या काळात कधीही मला येथे येता आलं असतं. त्या भावनेतून नाही. पण मनात भावना होती की आपण मंत्री झालो पण गडावर आलो नाही. दर्शनाला आलो नाही. त्यामुळे येथे येऊन दर्शन घेऊन पुढे मुंबईला जायचं. बाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी शक्ती मिळते, तीच खरी ताकद आहे. सर्वसामान्यांची सेवा करत या सगळ्या गोष्टींतून पुढे निघू.’
भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्रींकडून स्पष्ट भूमिका; म्हणाले..
या भेटीत महंत नामदेव शास्त्री यांच्याबरोबर काय चर्चा झाली असे विचारले असता मुंडे म्हणाले, ‘बाबा कधीच राजकीय चर्चा करत नाहीत. मी सुद्धा त्यांच्या सोबत कधी राजकीय चर्चा केली नाही. अध्यात्मावर चर्चा झाली. बाबा ज्ञानेश्वरी ग्रंथातून जे काही सांगतात त्यातून काहीतरी मिळतं. ते लाखो लोकांचे जीवन चांगलं बनवण्यासाठी उपयोगी येतं.’
आरोपींना फाशीच झाली पाहिजे
‘जे प्रकरण घडलंय ते प्रकरण 53 दिवस चालतंय. यात सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कुणी आरोपी असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आती ही भूमिका मी स्वतःहून मांडल्यानंतरही काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे की स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की या प्रकरणात जे कुणी आरोपी असतील त्यांना फाशीच झाली पाहिजे.’, असे धनंजय मुंडे म्हणाले.
छातीचा कोट करुन अजितदादांकडून धनंजय मुंडेंचा बचाव कदाचित त्यांना.. आव्हाडांचा थेट निशाणा