नात्याचा ओलावा संपला! जमिनीच्या जुन्या वादातून सख्या भावानेच भावाला संपवलं
भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पेठ बीड पोलिसांनी अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बीड शहरातील बार्शी नाका येथील इमामपूर रोड भागातील राहुल नगरमध्ये (Beed) जमिनीच्या जुन्या वादातून सख्या भावानेच आपल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पेठ बीड पोलिसांनी अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
फरताळे कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. शुक्रवार रात्री हा वाद अधिक चिघळला. याच रागाच्याभरात आरोपी निशिकांत उर्फ पिनू शहादेव फरताळे याने त्याचा भाऊ सचिन शहादेव फरताळे यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात सचिन फरताळे गंभीर जखमी झाले. मात्र, या हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, सकाळी त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून सख्या भावानेच भावाचा जीव घेतल्याने परिसरात शोकाकुल वातावरण पसरलं आहे.
