Lok Sabha Election : जाधव लोकसभेच्या रिंगणात; मंत्री कराडांना आव्हान देत ठोकला शड्डू!
Lok Sabha Election : राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Election) तयारी सुरू झाली आहे. जागावाटप, मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या मालिकाही सुरू झाल्या आहेत. यातच आता माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यांनी सुरुवातीलाच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांना फैलावर घेतले आहे.
जाधव यांनी आपण यंदा दोनशे टक्के छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले. ही घोषणा करतानाच त्यांनी मंत्री कराड यांना खोचक टोलाही लगावला. केंद्रात मंत्री असताना कराडांना संभाजीनगरातून लोकसभा का लढायची आहे?, हे म्हणजे जिल्हाधिकाऱ्याने मला तलाठी करा, असे म्हणण्यासारखे आहे. अडीच-तीन वर्षांपासून तुम्ही केंद्रात राज्य अर्थमंत्री आहात. शहरासाठी, जिल्ह्यासाठी काय आणले? काय दिवे लावलेत?, हे एकदा सांगा असे आव्हानच जाधव यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्यावर आता मंत्री कराड काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
NCP Crisis : पक्षात फूट नाहीच पण.. भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. डॉ. कराड पुन्हा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी तशी इच्छा बोलूनही दाखवली आहे. भाजपकडून कदाचित त्यांनाच तिकीट मिळेल असेही सांगितले जात आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरीकडे शिंदे गटानेही या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाचे मंत्री सांदिपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांची नावे आघाडीवर आहेत. लोकसभेची निवडणूक जर महायुतीने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला तर ही जागा कुणाला दिली जाणार यावरच पुढील गणित अवलंबून असणार आहेत.
असा आहे 2019 च्या निवडणुकीचा इतिहास
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते दुसऱ्यांदा निवडणुकीची तयारी करत आहेत. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले होते. शिवसेनेच्या हातची जागा गेली होती. या निवडणुकीत जाधव यांना 2 लाख 83 हजार मते मिळाली होती. त्यांच्या उमेदवारीमुळेच एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला होता. याचा फटका जाधव यांनाही पुढे विधानसभा निवडणुकीत बसला. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता मंत्री कराड भाजपकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत असताना जाधवांनीही पु्न्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. आता ते या निवडणुकीत कुणाची अडचण करतात हे लवकरच स्पष्ट होईल.
शरद पवारांच्या खुलाशानंतरही सुनावणी लावली; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर आरोप