धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यात ट्विस्ट; ट्विट करत फोडलं नव्या वादाला तोंड

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यात ट्विस्ट; ट्विट करत फोडलं नव्या वादाला तोंड

Dhananjay Munde Tweet after Resignation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगेचच देवगिरी बंगला गाठला आणि अजित पवार, सुनील तटकरे यांच्या बरोबर बैठक घेतली. यावेळी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. या घडामोडींनंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर त्यांनी एक्स सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करत मोठं वक्तव्य केले आहे. राजीनामा का दिला त्यामागच्या कारणांचा खुलासा त्यांनी केला आहे.

धनंजय मुंडेंनी नेमकं काय सांगितलं

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. न्यायालयीने चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कार्यमुक्त केलय

अजितदादांनी मात्र वेगळंच सांगितलं

दरम्यान, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला आहे. परंतु, धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये मात्र याचा कुठेच उल्लेख नाही. उलट वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा दिल्याचे मुंडेंनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि त्यांच्याच पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यात समन्वय नाही की जाणूनबुजून दोघांनी वेगवेगळी वक्तव्य केली का असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

मुंडेंना पुन्हा घेतलं तर मीच धडा शिकवेल : दमानिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा गेला खड्ड्यात त्यांना थेट बडतर्फच करा अशी मागणी केली आहे. आता त्यांचा राजीनामा घेतला पण नंतर त्यांना पुन्हा आणण्याचा प्रयत्न झाला तर मी धडा शिकवेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबाविण्यासाठी आपल्याला सगळ्यांना लढावा लागणार आहे. यापुढे मी असं काही दिसलं तर पक्षाच्या मुख्य नेत्याला फोन करून राजीनामा मागणार आहे. राज्यात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही.

धनंजय मुंडेंसारखे राजकारणात आहेत तोपर्यंत वाल्मिक कराड तयार होत राहणार. वाल्मिक कराडला तुरुंगात जी ट्रीटमेंट मिळत आहे ती आधी बंद करा अशी मागणीही दमानिया यांनी यावेळी केली. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधातील सर्व फाईल ओपन कराव्यात. यांच्या विरुद्ध ज्या ज्या केस दाखल करण्यासाठी येतील त्या सर्व केस देखील दाखल करून घ्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube