पंकजा मुंडेंच्या नावे अपहरण… पण सगळा प्रकारच निघाला बोगस, पोलिसांनी फोडलं माजी उपसरपंचाचं बिंग

पंकजा मुंडेंच्या नावे अपहरण… पण सगळा प्रकारच निघाला बोगस, पोलिसांनी फोडलं माजी उपसरपंचाचं बिंग

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर आणि गृहखात्यावर निशाणा साधला जातोय. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशातच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडमधून थेट मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव घेत एका माजी उपसरपंचाचं अपहरण झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाने खळबळ उडाली होती. पण आता हा अपहरणाचा सगळा प्रकारच बोगस असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणाचं बिंग पोलिसांनी फोडलं आहे…

नेमका काय होता हा प्रकार आणि पोलिसांनी कसं या प्रकरणाचं बिंग फोडलं?

सकाळी पाच वाजता आपल्याला मुंबईला जायचं आहे. आपल्याला पंकजाताईंकडून वीस लाखाचं पत्र आणायचं आहे, असे सांगून माजी सरपंच दत्तू इंगळे यांनी आपल्याला गाडीत घातले, आपले अपहरण केले आणि पाटोदा तालुक्यात नेले, एका खोलीत डांबले, आपल्याकडे अडीच लाख रुपये लुटले. नंतर साखळीने हातपाय बांधून कुलूप लावले, असा दावा केज तालुक्यातील माजी उपसरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांनी केला होता. इतकेच नाही तर तिघेजण बाहेर जाताच त्यांनी तिथून सुटका करवून घेत कुलूप लावलेल्या पायानेच थेट पोलीस स्टेशन गाठले होते. त्यांच्या या दाव्याने बीडमधील अपहरणाच्या घटना थांबत नसल्याची टीका होऊ लागली होती.

नेमके काय म्हणाले होते, ज्ञानेश्वर इंगळे? पहा हा व्हिडीओ…

 

पण आता हा सगळा प्रकारच बोगस असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे, तांदळे यांचा मसाल्याचा व्यवसाय इंगळे व तांदळे हे दोघेही एकाच तालुक्यातील आहेत. दोघे मिळून मसाल्याचा व्यवसाय करतात. त्यातील पैशांवरूनच या दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर इंगळे यांनी हा सगळा बनाव रचला. इंगळे ज्या ठिकाणाहून बाहेर पडले, त्याच ठिकाणी एका व्यक्तीने त्यांना पाहिले. पांढरे कपडे घालून समोरून गेले. त्यावेळी त्यांच्या पायात काहीही नव्हते. शेतातून जात होते, असा जबाब एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना दिला.

शिवाय आमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यात ग्रील असलेल्या खिडकी आहेत. तेथून बाहेर पडता येत नाही. तसेच प्रत्यक्षदर्शीनीही इंगळे यांना पाहिले. कार चालकाचाही जबाब घेतला. जबाब, पाहणी आणि इतर मुद्यांवरून हे सर्व संशयास्पद आहे, असे बीडचे अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले. आता यात बी समरी करून न्यायालयात पाठविले जाणार आहे. त्यांच्या आदेशानुसार खोटी फिर्याद दिली म्हणून गुन्हा दाखलची प्रक्रिया केली जाईल, असेही पांडकर यांनी स्पष्ट केले. तर माजी सरपंचाने आपण डांबून ठेवले नसून याच उपसरपंचानेच आपल्याला मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube