मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण; प्रेमप्रकरणातून तरुणाचं टोकाचं पाऊल

या मारहाणीमुळे आणि सार्वजनिक बदनामीमुळे ज्ञानेश्वर गंभीर मानसिक तणावाखाली गेला होता.

News Photo   2026 04 01T144630.249

बीड तालुक्यातील मांजरसुंबा (Beed) परिसरात प्रेमसंबंधांच्या वादातून एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असं मृत तरुणाचं नाव आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि मानसिक छळामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मांजरसुंबा येथील ज्ञानेश्वर याचे नेकनूरजवळील एका गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी रागाच्या भरात ज्ञानेश्वरला गावात बोलावून घेतलं. त्यानंतर त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेत चार जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप करत गावात बदनाम केल्याचंही समोर आलेल्या माहितीत उघड झालं आहे.

पुण्याहून बीडला चोरीसाठी गेले, टॉवरवर चढताच तोल गेला, दोघांचा मृत्यू

या मारहाणीमुळे आणि सार्वजनिक बदनामीमुळे ज्ञानेश्वर गंभीर मानसिक तणावाखाली गेला होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने, मला खूप मारले, गावात चोरटा म्हणून बदनाम केलं, तुला जिवे मारून टाकू अशा धमक्या दिल्या, असा उल्लेख केला आहे. घटनेनंतर ज्ञानेश्वरने धुळे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर पंक्चर दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, मृताच्या आईने गंभीर आरोप करत म्हटलं की, माझ्या मुलाला बोलावून झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आणि त्याचे व्हिडिओही काढण्यात आले. आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत उंदरे, सचिन उंदरे, अशोक उंदरे आणि प्रेम उंदरे अशी आरोपींची नावं असून, त्यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

follow us