बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना; माहेरी आलेल्या पुतणीवर चुलत्याचा अत्याचार

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता युसूफ वडगाव येथील पोलिसांनी एक टीम फरार आरोपीच्या शोधत पाठवली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Beed Crime

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. (Beed) येथील युसूफ वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खेडेगावातील रहिवाशी असलेल्या 50 वर्षीय नराधम चुलत्याने माहेरी भेटण्यासाठी आलेल्या आपल्या 25 वर्षीय विवाहित पुतणीला आपल्या वासनेची शिकार केली आहे. नराधमाने पीडितेला पाण्यात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना तब्बल 5 महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच 14 ऑक्टोबर 2025 रोजी एक 25 वर्षीय विवाहित तरुणी ही तिच्या माहेरी आई-वडिलांकडे आली होती. शेत वस्तीवर शेजारी राहत असलेल्या तिच्या नराधम चुलत्याने डाव साधून तिच्यावर दुपारच्या सुमारात पाण्यात गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही तर या घटनेची कुणाकडं वाच्चता केल्यास तुझ्या आई, वडिलांना जीवे मारून टाकीन, अशी धमकी देखील नराधमाने पीडितेला दिली होती. असं पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

बीड विवाहितेचा अत्याचार प्रकरण; आता पोलिस पाटील, ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल होणार

विवाहित पीडित परत पाच महिन्यानंतर माहेरी आली. त्यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितला. या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्न होऊन मुलगी सासरी नांदत असताना तिच्यावर भावानं वाईट नजर ठेवली याचा पीडितेच्या वडिलाना मोठा धक्का बसला. मात्र, वेळेचा विलंब न करता शनिवारी (21 मार्च) सायंकाळी पीडीतेच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलीस स्टेशनमध्ये नराधम चुलत्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेतील आरोपी फरार झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता युसूफ वडगाव येथील पोलिसांनी एक टीम फरार आरोपीच्या शोधत पाठवली असल्याचं सांगण्यात आलं आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपी हा फरार असून तो जिल्ह्याबाहेर राहत असल्याचं समजतं. पोलीस त्याच्या मागावर असल्याचे सांगण्यात आलं आहे. अद्याप त्या नराधमाचा आतापता लागलेला नाही. मात्र, पीडितेचा संसार उध्दवस्त करणाऱ्या आणि नात्याला काळीमा फासणाऱ्या नराधमाला लवकरच बेड्या ठोकण्यात येतील, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारत बर्डे करत आहेत.

follow us