पंजाबमध्ये तिहेरी हत्याकांड; छ.संभाजीनगरमध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आवळल्या मुसक्या
Firozpur Triple Murder Case : देशाला हादरवून सोडणाऱ्या पंजाबमधील फिरोजपूर (Firozpur Triple Murder) इथल्या तिहेरी हत्याकांडात सामील असलेल्या सात सशस्त्र आरोपींना अटक करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेनंतर आरोपी समृद्धी महामार्गावरून पळून जात असताना पंजाब पोलिसांनी याबाबत छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना (Chhatrapati Sambhajinagar Police Commissioner) याबाबतची माहिती दिली. गुन्हे शाखा पोलिस आणि सिडको पोलिसांनी पहाटे पावणे सहा वाजता सापळा रचून गाडी अडवली आणि मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना आज संध्याकाळी पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
चित्रनगरीच्या बाप्पाचे थाटामाटात आगमन, प्राणप्रतिष्ठा करून बाप्पा झाले विराजमान
सात शार्प शूटर पंजाबमधून पळाले
आज पहाटे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करून संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या आरोपींना अटक केली. पंजाबमधील फिरोजपूर येथील तिहेरी हत्याकांडात सहभागी असलेल्या सात कुख्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेत काही दिवसांवर लग्न आलेल्या एका तरुणीची निर्घृणपण हत्या करण्यात आली होती. शस्त्रांनी सुसज्ज असलेले हे आरोपी घटनेनंतर महाराष्ट्रात पळून आले होते. याबाबत माहिती मिळताच राज्यात अलर्ट देण्यात आला. संभाजीनगर हद्दीतून जात असताना आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलं.
बुलेटप्रूफ जॅकेट घालून ठोकल्या बेड्या
दरम्यान, पंजाबमधील शार्प शूटर महाराष्ट्रात येत असल्याची माहिती मिळताच पहाटे 3:00 वाजता पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना मोबाइलवर पंजाब पोलिसांच्या AGTF चे ADG प्रमोद बान यांचा फोन आला. अत्यंत गंभीर आणि तातडीची मदत हवी, असं त्यांना सांगण्यात आलं. क्षणाचाही विलंब न करता शहर पोलीस दलाने तातडीनं पथक तयार करत आरोपींचा माग घ्यायला सुरूवात केली. एमएच 26 एसी 5599 क्रमांकाच्या गाडीत आरोपी समृद्धी महामार्गावरुन येत असल्याची माहिती मिळताच त्या गाडीला सकाळी 5:45 वाजता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अडवलं.
अत्यंत धाडसीपणानं गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे आणि सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील शहर पोलिसांच्या 10 अधिकाऱ्यांसह 40 कर्मचाऱ्यांचं पथक आणि QRT पथक्कानं शस्त्रधारी आरोपींना बुलेटप्रूफ जॅकेट घालून पकडलं. आता पंजाब पोलीस आमच्याशी सातत्यानं संपर्कात आहेत. आरोपींना आज संध्याकाळी त्यांच्या ताब्यात दिलं जाईल, अशी माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.