संकटमोचक गिरीश महाजन अंतरवलीमध्ये दाखल, मागण्या मान्य करण्यासाठी मागितला एका महिन्याचा वेळ
Jalna Maratha Protest : जालन्यातील अंतरवली गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेमुळं सरकारवर आंदोलक आणि विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जाते. लाठीचार्जच्या या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होतो. दरम्यान, काल शरद पवार, छत्रपती उदयराजे भोसले, उद्धव ठाकरे यांसारख्या अनेक नेत्यांनी आदोलकांची भेट घेतली. त्यानंतर आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे देखील आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य कऱण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला.
यावेळी माध्यमांशी बोलतांना महाजन म्हणाले की, आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याची गजर नव्हती. लाठीचार्जची घटना मराठा आंदोलकांवर होणं हे दुर्देवी आहे. आता आधीच्या एसपींची बदली करून त्यांच्या जागी नवीन एसपी आले. मात्र, जो लाठीहल्ला झाला, त्यात गावकरी, महिला, मुलं अशी दिडेशेहून अधिक लोक जखमी झाली आहेत. त्यामुळं याची शिक्षा पोलिसांना मिळालीच पाहीजे, आज जरी अधिकाऱ्यांची बदली झाली असली तर ते चौकशीतून सुटणार नाहीत, असं महाजन म्हणाले.
ते म्हणाले, मराठा आरक्षणा संदर्भात समिती नेमूण तीन महिने झाली तरी काहीच झालं नाही, हे खरं आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळं या विषयाला खरंतर चालना मिळाली नाही. मी अण्णा हजारेंच्या आंदोलनात होतो. माहितीचा अधिकार, लोकपाल विधयक त्यांनी मोठा लढा देऊन आणलं. मात्र हे काही लगेच झालं नाही. आधीच सरकार गेलं, त्यानंतर नवीन सरकार आलं. त्यानंतर अण्णा हजारेंच्या मागण्या मान्य झाल्या. त्यामुळं मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा वेळ द्या, असं महाजन म्हणाले.
यावेळी महाजन यांनी मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला. सरकार तुमच्या मागण्यांची दखल घेईल, असा शब्द देत त्यांनी आंदोलन कर्त्यांना उपोषण सोडावं, असं आवाहनही केलं. यावेळी भाजप आमदार नितेश राणे, आमदार मंगेश चव्हाण हे देखील उपस्थित होते.
महाजन यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागं घेण्याची विनंती केली. मात्र, मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत.ते म्हणाले की, जो गोळीबार झाला तो प्रकार चुकीचा होता, आज आमच्या गावातून 60 लोकांना उचललं जात आहे. पोरांना तुरुंगात नेले जात आहे. आणि अधिकाऱ्यांवर कोणताही कारवाई होत नाही. साधं डिसमिसही केलं जात नाही. आमच्या आई-वडिलांवर हल्ला करण्यात आला, असं जरांगे म्हणाले.
जीआर काढून मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली. मी माझा शब्द दिला आहे, जीआर तोपर्यंत दिसणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
हे आरक्षण एक दिवस तरी कोर्टात टिकेला का, असा सवाल गिरीश महाजन यांनी जरांगे यांना केला. यानंतर गिरीश महाजन यांना आपल्या सरकारने आरक्षण दिले. मात्र, सरकार गेल्याने आरक्षण गेल्याचं महाजन यांनी सांगितले. यावर जरांगेंनी आम्हाला आरक्षण कसे गेलं यात पडायचं नाही, मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्या, जीआर काढा. 2004 चा मराठी आणि कुणबी एक असल्याचा जीआर काढा, अशी मागणी केली.