बीडच्या खूप्रकरणात ट्वीस्ट; पतीला चिकन राईस आणायला पाठवलं अन् प्रियकराला सांगून…
सुरुवातीला रस्ते अपघात वाटणाऱ्या या घटनेचा तपास करताना पोलिसांनी हा घातपात म्हणजेच पूर्वनियोजित कट असल्याचे उघडकीस आणले आहे.
बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस (BEED) ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लिंबागणेश परिसरात 31 मे रोजी घडलेल्या किरण सोनवणे या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला रस्ते अपघात वाटणाऱ्या या घटनेचा तपास करताना पोलिसांनी हा घातपात म्हणजेच पूर्वनियोजित कट असल्याचे उघडकीस आणले आहे. अनैतिक संबंधातून पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे.
या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी मृत किरण सोनवणे याची पत्नी प्रियंका सोनवणे, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे या तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत किरण सोनवणे याला दारूचे व्यसन होते आणि तो दारू पिऊन पत्नी प्रियंका हिला वारंवार त्रास देत होता, असे आरोपींचे म्हणणे आहे. या छळाला कंटाळून आणि आपल्या प्रेम प्रकरणातील अडसर दूर करण्यासाठी प्रियंकाने प्रियकर दशरथ परदेशी याच्यासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला.
मोठी बातमी बीडमध्ये भीषण दुर्घटना, भाविकांची बोट उलटून 50 जण बुडाले
घटनेच्या दिवशी प्रियंकाने किरणला रात्रीच्या वेळी हॉटेलमधून चिकन राईस आणण्यासाठी घराबाहेर पाठवले. किरण घराबाहेर पडल्याची संपूर्ण माहिती तिने तात्काळ फोनवरून प्रियकर दशरथला दिली. प्रियंकाकडून टीप मिळताच दशरथ परदेशी याने त्याचा मित्र धीरज येडे याच्या मदतीने किरणचा रस्ता अडवला. त्यानंतर दोघांनी मिळून किरणचा गळा आवळून त्याची हत्या केली. हा गुन्हा केवळ हत्या न वाटता अपघात वाटावा, यासाठी त्यांनी किरणचा मृतदेह रोडलगत टाकून त्याच्या अंगावर त्याचीच दुचाकी ठेवून दिली आणि तिथून पळ काढला.
या धक्कादायक घटनेतील सर्वात मोठा खुलासा म्हणजे, किरणची हत्या केल्यानंतर प्रियकर दशरथ याने प्रियंकाला फोन करून “कार्यक्रम ओके” असा कोडवर्ड वापरून निरोप दिला. इतकेच नव्हे तर, हत्येच्या थरारानंतर त्या संपूर्ण रात्री प्रियंका आणि दशरथ यांच्यात ‘इन्स्टाग्राम’वर सलग चार ते पाच तास संवाद सुरू होता. पोलीस उपअधीक्षक आणि नेकनूरच्या पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक तपास केला असता, संशयितांच्या कॉल रेकॉर्ड्स आणि इन्स्टाग्राम डेटावरून पोलिसांच्या हाती भक्कम डिजिटल पुरावे लागले. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. या हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.