धक्कादायक! लातूर मनपा आयुक्तांचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

Latur News : लातूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी घडली. या घटनेत आयुक्त मनोहरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. आता मनोहरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी द दाखल झाले. त्यांनी रिव्हॉल्वर ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. मनोहरे यांनी स्वतःवर गोळीबार करण्यापर्यंत असं काय घडलं, यामागे काय कारणं आहेत याची माहिती घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे. मात्र अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. या घटनेची लातूर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. नागरिकांतही संभ्रम आहे. मनोहरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला असावा असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे. मनोहरे यांनी कौटुंबिक कारणातून की त्यांच्यावरील कार्यालयीन तणावात त्यांनी हा निर्णय घेतला का अशी चर्चा लातुरकरांत सुरू आहे.
मोठी बातमी! अंजली दमानिया अन् मनोज जरांगे पाटील यांच्यावर लातूर जिल्ह्यात गुन्हा दाखल
याबाबत समजलेली माहिती अशी, शनिवारी रात्री बाबासाहेब मनोहरे नेहमीप्रमाणे कुटुंबियांसोबत जेवले. त्यांनी गप्पाही मारल्या. त्यानंतर मनोहरे त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांनी स्वतःकडील रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकताच कुटुंबियांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी बाबासाहेब मनोहरे जखमी अवस्थेत दिसले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सह्याद्री हॉस्पिटलचे संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब मनोहरे यांनी डोक्यात जी गोळी झाडून घेतली ती उजव्या बाजूने आरपार निघाली आहे. या गोळीने मनोहरे यांच्या डोक्याच्या कवटीला इजा झाली आहे. मेंदूच्या काही भागालाही इजा झाली आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. याबाबत आणखी माहिती मिळू शकलेली नाही. बाबासाहेब मनोहरे कठोर शिस्त आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांतही त्यांनी काम केले आहे. लातूर महापालिकेत ते अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झाले होते. नंतर बढती मिळून आयुक्त झाले होते. मोठ्या पदावर नोकरीला असताना मनोहरे यांनी असा निर्णय का घेतला याचीच चर्चा सध्या सुरू आहे.
धक्कादायक! लातूरमध्ये NEET परीक्षेत दहा विद्यार्थ्यांना दिले गुण वाढवून, CBI तपासात झालं उघड