धनंजय मुंडेंनी गुलाल उधळला ! अंबाजोगाई बाजार समितीवर एकहाती सत्ता
Dhananjay Munde : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी (APMC Elections) शुक्रवारी मतदान पार पडले. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून काही समित्यांचे निकाल हाती आले आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बाजार समितीच्या (Ambajogai Market Committee) निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे.
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत. ग्रामीण राजकारणावर अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीची पकड आहे हे या निकालातून स्पष्ट होत आहे. अंबाजोगाई हे परळी आणि केज विधानसभा मतदारसंघ अंतर्गत संयुक्त आहे.
पालघर बाजार समितीत शिंदे गटाचा सुपडा साफ
पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे.आघाडीने 17 पैकी 17 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिंदे गटाला भोपळाही फोडता आला नाही. 15 जागी महाविकास आघाडीने बिनविरोध विजय मिळवला आहे तर व्यापरी गटाच्या दोन जागांसाठी चार जणांत लढत होती. याही निवडणुकीत मतदारांनी आघाडीच्याच बाजून कौल दिला. त्यामुळे बाजार समितीत शिंदे गटाचा सुपडा साफ झाला आहे.
पालघर बाजार समितीत महाविकास आघाडीचा डंका; शिंदे गटाला मिळाला भोपळा !