महाराष्ट्राच्या राजकारणात तिसऱ्या पिढीची एन्ट्री; भाजपाच्या पहिल्या यादीत ‘या’ दोन नावांची चर्चा…
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. भाजपने यंदा काही मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या मुलामुलींना रिंगणात उतरवले आहे. यातील दोन नावं अशी आहेत जी तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करतात. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भाजपने भोकरमधून तिकीट दिलं आहे. तर निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही नेत्यांना राजकारणाचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडून मिळाला आहे. आता या तिसऱ्या पिढीतील नेते राजकारणात काय कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
श्रीजया चव्हाण यांचे वडील अशोक चव्हाण आणि आजोबा शंकरराव चव्हाण दोघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच संभाजी पाटील निलंगेकर यांचे आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. फक्त मराठवाडाच (Maharashtra Elections 2024) नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चव्हाण आणि निलंगेकर परिवाराचा दबदबा दिसून येतो.
Eknath Shinde : ‘शिवतारेंसारखा माणूस हवा, दोस्ती करो तो दिलसे अन् दुश्मनी भी दिलसे
भोकरमध्ये भाजप शून्य
नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) भोकर हा असा मतदारसंघ आहे जेथे अजून तरी भाजपला (BJP) यश मिळालेलं नाही. या मतदारसंघात भाजपचा मित्र पक्ष शिवसेना (Shivsena) लढत आला आहे. हा मतदारसंघ चव्हाण कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ राहिला आहे. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण देखील याच मतदारसंघातून विजयी होऊन मुख्यमंत्री राहिले होते. अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण 2014 मध्ये याच मतदारसंघातून राज्याच्या विधानसभेत पोहोचल्या होत्या. आता मुलगी श्रीजया चव्हाण याच मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा (Congress Party) बालेकिल्ला राहिला आहे. पण आता चव्हाण भाजपात आल्याने येथे विजयी होऊ असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे.
संभाजी पाटील तिसऱ्या पिढीचे नेते
मराठवाड्यातील राजकारणावर निलंगेकर परिवाराचा दबदबा राहिला आहे. संभाजी पाटील निलंगेकर हे निलंगेकर कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेते आहेत. भाजपने त्यांना निलंगा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांचे आजोबा शिवाजीराव निलंगेकर 1985-86 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. निलंगेकर परिवाराचा दबदबा लातूर जिल्ह्यात (Latur News) जास्त आहे. सन 1999 पासून निलंगा मतदारसंघातून निलंगेकर कुटुंबातील सदस्यच विजयी होत आले आहेत.
महायुतीचं जागावाटप फायनल; भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर संभाजी पाटील निलंगेकर तिसऱ्यांदा निवडणुकीत उतरले आहेत. याआधी 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये मंत्री सुद्धा राहिले आहेत. या मतदारसंघात निलंगेकर कुटुंबाचा राजकीय प्रभाव पाहता भाजपने पुन्हा निलंगेकर यांनाच तिकीट दिले आहे.