ठाकरे गटात असंतोष, नव्या लोकांची बॉसगिरी; दानवेंबाबत शिरसाटांचा दावा काय?
Sanjay Shirsat on Ambadas Danve : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ चर्चेत आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खैरेंवर तोफ डागली आहे. इतकेच नाही तर दानवे लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशा वावड्या आज सकाळपासूनच उठत आहेत. या चर्चांत काहीच अर्थ नसल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलं. ठाकरे गटातील या घडामोडींवर आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी भाष्य केलं आहे.
मुळात जे शिवसैनिक आहेत त्यांची आता ठाकरे गटात कोंडी होत आहे. नवीन आलेले लोक त्यांच्यावर बॉसगिरी करत आहेत. या लोकांना पक्षात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नेतेपद दिले जाते. त्यामुळे ठाकरे गटात प्रचंड असंतोष आहे त्याचा परिणाम पक्ष सोडण्यात होतो, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
Ambadas Danve : विरोधकांच्या दबावामुळेच ललित पाटील प्रकरणाचा तपास; दानवेंनी स्पष्टच सांगितलं
सोमवारी शिंदे गटात प्रवेश करणारा नेता छत्रपती संभाजीनगरसाठी लोकसभेचा उमेदवार राहिल का, तो नेता म्हणजे अंबादास दानवे आहेत का, असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्यावर शिरसाट म्हणाले, सोमवारी पक्षप्रवेश करणारा नेता कुणीही असू शकतो. तोच उमेदवार असेल का याबद्दल आताच सांगता येणार नाही. महाराष्ट्रात सोमवारी राजकीय भूकंप होणार हे माझे वक्तव्य फक्त संभाजीनगरपुरते मर्यादीत आहे. माझ्या वक्तव्याने ठाकरे गटात गोंधळ उडाला . चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंच्या वादाचा आणि माझ्या वक्तव्याचा काहीच संबंध नाही, असेही शिरसाट म्हणाले.
खैरे कायमच मला डावलतात : अंबादास दानवे
पक्षप्रमुखांनी अजून कोणताच चेहरा दिलेला नाही. मी इच्छा व्यक्त केली आहे. आता ते कुणाला उमेदवारी देतात ते पाहू. चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलत असतात. हे काही आजचं नाही. मी उद्धव ठाकरेंसाठी काम करतो चंद्रकांत खैरेंसाठी पक्षाचं काम करत नाही. त्यामुळे खैरे माझ्याबाबत काय बोलतात याचं मला देणंघेणं नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.