‘लाठ्या-काठ्यांची भाषा बंद करा, राजीनामा द्या’; संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चाचा संताप !

‘लाठ्या-काठ्यांची भाषा बंद करा, राजीनामा द्या’; संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चाचा संताप !

Maratha Reservation : मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात पाय ठेवल्यास त्यांचा तीव्र विरोध करू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे. तर सरकारने लाठ्या काठ्यांची भाषा बंद करावी, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिला.

सरकारला सत्तेची मस्ती चढली; आंदोलकांवरील लाठीचार्जवरून विरोधकांनी घेरले !

आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा जाहीर निषेध करतो. माझा राज्य सरकारला एकच प्रश्न आहे की मागील दीड वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने काय ठोस पावले उचलली ज्यामुळे समाधान होईल. विद्यार्थ्यांचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे. माझा राज्य सरकारला पुन्हा प्रश्न आहे की आम्हाला न्याय देणार की लाठ्या देणार? कृपया, लाठ्या काठ्यांची भाषा बंद करावी. तत्काळ योग्य तो निर्णय घ्यावा. राज्यात चारही पक्ष आलटून पालटून सत्तेत आले. एकही पक्ष मराठा आरक्षणाबाबत गांभीर्याने घेत नाही या दुर्दैवामुळेच आज माझ्या भावांना लाठ्या खाव्या लागल्या, अशा शब्दांत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राजीनामा द्या, एसपीला निलंबित करा – संभाजी ब्रिगेड

संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे की त्या पोलीस अधीक्षकाला तत्काळ निलंबित केले पाहिजे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. सरकारला जर परिस्थिती हाताळता येत नसेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा काहीच अधिकार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांकडून तोंडाला पाने पुसण्याचे काम केले जात आहे. उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले जात होते. यावर कोणताही मध्यम मार्ग न काढता, चर्चा न करता थेट लाठीमार करण्यात आला.

Maratha Reservation : आंदोलन चिघळले! CM शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश

पोलीस अधीक्षकाला तत्काळ निलंबित केलं पाहिजे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. संभाजी ब्रिगेड हे आजिबात सहन करणार नाही. जालन्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. जालन्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाय ठेऊन दाखवावा संभाजी ब्रिगेड त्याचा तीव्र विरोध करेल. अशा अमानवी कृत्याचा संभाजी ब्रिगेड तीव्र निषेध करते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि पोलीस अधीक्षकाला निलंबित करावे अशी आमची मागणी आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube