गाडी येण्याची चर्चा अन् सगळ्या टपऱ्या बंद; तुकाराम मुंढेंच्या ‘सिंघम’ स्टाईलमुळं परळीत सकाळपासूनच शुकशुकाट

उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांना हा नियम लागू असून मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल.

News Photo   2026 06 14T171135.410

राज्यात सध्या आयुक्त तुकाराम मुंढे (Mundhe) यांची मोठी चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांची बदली झाल्यानंतर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यांच्या या कारवाईच्या धडाक्याचा अनेकांनी धसका घेतला आहे. एक पथक बीडच्या परळी शहरात विविध ठिकाणी कारवाईसाठी येणार असल्याची चर्चा होती. ही बातमी शहरात पसरताच शहरातील सर्वच पान टपऱ्या सकाळपासून बंद झाल्याचं पाहायला मिळाल.

या ज्या काही पान टपऱ्या बंद झाल्या त्यावरच गुटख्यांची आणि वेगवेगळ्या पानांची विक्री होते. अशातच राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या कारवाया पाहून पान टपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत. परळीत तुकाराम मुंढेंचे पथक आल्याची चर्चा होताच. या सर्व पान टपऱ्या बंद दिसून येतात. अन्न औषध प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईची अफवा आणि बंद ठेवलेल्या पान टपऱ्या याची जोरदार चर्चा रंगली. गेल्या महिनाभरात तुकाराम मुंढेंनी एकापाठोपाठ एक कारवाया करत 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 35 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईनंतरही राज्यातील काही ठिकाणी अवैध गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री होत असल्याने आता आयुक्त मुंढे आणखी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आता, उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे तुकाराम मुंढेंनी म्हटलं. तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केला आहे. संबंधित विक्रेत्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत.

गोठ्यात एकही गाय, म्हैस नाही पण दूध 100 लिटर कसं?, बीडच्या आष्टीचं भयान वास्तव

वर्तमानपत्रात-खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) रडारवर आले आहेत. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका, अशी सक्त ताकीदही खाद्यविक्रेत्यांना देण्यात आली आहे. आता, गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्कविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 (मकोका) लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंनी निर्देश दिले आहेत.

उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांना हा नियम लागू असून मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. मकोका गुन्हा दाखल करण्यासाठी आरोपीचा इतिहास पाहून आवश्यक त्या गुन्ह्यानुसार कारवाई केली जाणार, असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवून, वाहतूक , वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटीत नेटवर्क विरोधात मकोका लागू करण्याचे आदेश तुकाराम मुंढेंकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

ही संघटित गुन्हेगारी आहे, त्यामध्ये विक्री करणारा आणि विकत घेणारा देखील जबाबदार आहे, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर यामध्ये आमचे काही अधिकारी देखील इनवॉल्ड आहेत, असे आरोप होत आहेत. मात्र, याची देखील चौकशी आम्ही करतोय, अधिकारी जर सहभागी असल्याचे आढळले तर तुम्हाला सांगण्यात येईल, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच मुंढेंनी दिला आहे.

follow us