गोठ्यात एकही गाय, म्हैस नाही पण दूध 100 लिटर कसं?, बीडच्या आष्टीचं भयान वास्तव
नमुने तपासणीत होणारी संभाव्य तडजोड थांबवण्यासाठी प्रशासनाने आता ऑन दि स्पॉट दूध तपासणी करणारी अद्ययावत यंत्रणा सोबत ठेवणं काळाची गरज बनली आहे.
दावणीला साधी एक गाय किंवा म्हैसदेखील बांधलेली नाही, (Ashti) गोठ्यात चारा-पाण्याचा पत्ता नाही, तरीही संकलन केंद्रांवर दररोज शेकडो लिटर दूध घातलं जातय. हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटेल, पण हेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचं आजचे धक्कादायक आणि तितकंच संतापजनक वास्तव आहे. तालुक्यात सध्या सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळणारा एक भयंकर गोरखधंदा राजरोसपणं सुरू आहे.
येथे शुद्ध दुधाच्या नावाखाली पांढरं विष विकलं जात असून, दररोज हजारो लिटर भेसळयुक्त दूध थेट बाजारात आणलं जातय. सर्वांत दुर्दैवी बाब म्हणजे, नागरिकांच्या जिवाशी चाललेल्या या खेळाकडं अन्न व औषध प्रशासनाचं पूर्णपणं दुर्लक्ष आहे. कारवाईच्या नावाखाली केवळ कागदोपत्री थातूरमातूर सोपस्कार पार पाडले जात असल्याने, या काळ्या बाजाराचे मुख्य सूत्रधार आणि आरोपी मात्र मोकाट फिरत आहेत.
तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये ; या ठिकाणी 13 लाखांचा भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त
आष्टी तालुक्यात दूध संकलनाच्या नावाखाली एक मोठी संघटित साखळी कार्यरत आहे. हे दूध नसून त्यात घातक रसायने, युरिया, कॉस्टिक सोडा, निकृष्ट डिटर्जंट पावडर आणि पाण्याचा बेसुमार वापर करून कृत्रिमरीत्या केमिकलयुक्त दूध बनवलं जातं. नागरिकांचा रोष वाढल्यावर अधिकारी केवळ देखाव्यासाठी येतात, नमुने प्रयोगशाळेत पाठवतात. मात्र, पुढं त्या अहवालाचं काय होतं, हे नेहमीच संशयास्पदरीत्या गुलदस्त्यात राहतं. नमुने तपासणीत होणारी संभाव्य तडजोड थांबवण्यासाठी प्रशासनाने आता ऑन दि स्पॉट दूध तपासणी करणारी अद्ययावत यंत्रणा सोबत ठेवणं काळाची गरज बनली आहे.
धाडीच्या दिवशीच दूध संकलन घटते?
एरवी ज्या संकलन केंद्रांवर दररोज हजारो लिटर दुधाची आवक असते, नेमक्या ज्या दिवशी अन्न व औषध प्रशासनाची धाड असते, त्याच दिवशी दुधाचे प्रमाण अचानक निम्म्याहून अधिक घटते. हा मोठा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनाने या केंद्रांवर दररोज जमा होणारे दूध आणि कारवायांनंतर घटलेली आवक याच्या नोंदी तपासल्यास भेसळीचे हे कोट्यवधींचे रॅकेट सहज उघडकीस येऊ शकते.