Maratha Reservation : ‘एक-दोन हजार डिझेल टाकायला देऊ का?’ जरांगे पाटलांचा भुजबळांना खोचक टोला
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या (14 ऑक्टोबर) त्यांची आंतरवाली सराटी येथे विराट जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. सभेची तयारी सुरू असतानाच आता या सभेवरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. जरांगे पाटील यांच्या सभेच्या खर्चावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रश्न उपस्थित केले होते. सभेसाठी 7 कोटी रुपये कुठून आले?, असा सवाल त्यांनी केला होता. त्यांच्या या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे.
Sunil Tatkare : ‘त्यावेळी उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जाण्याची इच्छा होती’; तटकरेंचा गौप्यस्फोट
भुजबळ यांनी विचारलेल्या या प्रश्नावरून जरांगे पाटील यांनी खोचक उत्तर दिले आहे. डिझेल टाकण्यासाठी एक-दोन हजार रुपये देऊ का, असा खोचक सवाल त्यांनी भुजबळांना विचारला आहे. भुजबळ म्हणतात, सात कोटी रुपये कुठून आले, त्यांनी कुणी सांगितलं 7 कोटी जमा झाल्याचं. त्याला (भुजबळांना) पाहिजे का दोन एक हजार रुपये डिझेल टाकायला. भुजबळ आता काहीही बोलू लागले आहेत. त्यांना काही झालंय का, सरकारने त्यांना लवकर रुग्णालयात नेलं पाहिजे. एवढा मोठा माणूस असे काहीही कसा बोलू शकतो. मी केलेल्या एवढ्या दौऱ्यात एकही मराठा जर म्हणाला मी 50 रुपये घेतले तर तो म्हणेल ते करायला मी तयार आहे.
काय म्हणाले होते भुजबळ ?
समता परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर टीका केली होती. 100 एकरात शेती साफ करून मैदान करताय, सात कोटी रुपये देखील जमा केले आहेत. एवढे पैसे येतात कुठून? असा सवाल भुजबळांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
पवारांचे थेट वार! अजितदादांचे मुख्यमंत्रीपद स्वप्नचं राहणार; UN चा अध्यक्ष म्हणून पत्र लिहिलं तरी…
भुजबळांनी जबाबदारीने बोललं पाहिजे
ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही असे भुजबळ म्हणाले होते. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले, आम्ही ओबीसीमधूनच आहोत. त्यामुळे आम्ही आरक्षण घेणार आहोत. देणार नाही म्हणजे त्यांची मक्तेदारी थोडीच आहे. आरक्षण ही सरकारने दिलेली सुविधा आहे. ओबीसी 54 टक्के असल्याचं सांगणाऱ्या भुजबळ यांनी आम्हाला हिशोब सांगण्याची गरज काय. तुम्ही तुमचं पाहा आम्ही आमचं पाहू. भुजबळ हे घटनेच्या पदावर आहेत त्यामुळे त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे, असेही जरांगे पाटील म्हणाले.