पावसाची प्रतीक्षा संपणार; मराठवाडा-विदर्भात जोरदार कोसळणार, काय आहे हवामान अंदाज?
शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून राज्याच्या अन्य भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे.
राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम असताना खरीप पिकांवरही संकट गडद होत आहे. आज मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहून तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, बुधवारपासून राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असून बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, बीड आणि जळगावमध्ये विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे.
Tukaram Mundhe : सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट; सरकारची तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला स्थगिती
गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय नंदुरबार, धुळे, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे. शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून राज्याच्या अन्य भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.