एकही वीट अन् दगड न रचता शेकडो विहिरी आणि गाय गोठे दाखवले; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घोटाळा समोर
गरिबांच्या हक्काच्या योजना लाटण्यासाठी बोगस लाभार्थी आणि कागदपत्रांचा आधार घेण्यात आला.
शासकीय योजनांचा लाभात मोठा घोटाळा (Farmer) केल्याचं समोर आलं आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथे अनेक योजनांनाच भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे उघडकीस आले आहे. गावात प्रत्यक्षात एकही वीट न रचता केवळ कागदावर शेकडो गाय गोठे आणि विहिरी उभारून शासकीय निधीवर डल्ला मारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घोटाळ्याच्या निषेधार्थ संतप्त येवलवाडीकरांनी मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला.
येवलवाडी येथील काही स्थानिक दलाल आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा संपूर्ण गैरव्यवहार झाला आहे. गरिबांच्या हक्काच्या योजना लाटण्यासाठी बोगस लाभार्थी आणि कागदपत्रांचा आधार घेण्यात आला. गावात प्रत्यक्षात कुठेही विहीर खोदली गेलेली नाही की गोठा बांधला गेलेला नाही, तरीही शासकीय रेकॉर्डवर मात्र ही कामे पूर्ण झाल्याचे दाखवून लाखो रुपयांची बिले हडप करण्यात आली. या घोटाळ्यामुळे खरी गरजू असणारी कुटुंबे मात्र अजूनही मदतीपासून वंचित आहेत.
बीडमध्ये धक्कादायक प्रकार उघड; महिलेचा 22 वर्षांपूर्वी मृत्यू, पण पेन्शन सुरू
या प्रचंड भ्रष्टाचाराची माहिती मिळताच येवलवाडीतील शेकडो ग्रामस्थ आक्रमक झाले. महिला आणि पुरुषांनी एकत्रित येत पाटोदा पंचायत समितीवर आक्रोश मोर्चा काढला. शासकीय पैशांची लूट करणाऱ्या चोरांना तात्काळ अटक करा, अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाईचे आश्वासन मिळेपर्यंत ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या मुख्य गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू ठेवले.
आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी प्रशासनासमोर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ग्रामस्थांनी या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल केल्यापासून, घोटाळा करणारे संबंधित लोक उघडपणे गुंडगिरी करत असून तक्रारदारांना धमकावत आहेत. स्थानिक पातळीवरील शासकीय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊच शकत नाही, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.