राखेचा धंदा करण्यासाठी तुम्हाला पिस्तुल लागतात का? सुरेश धसांचा पुन्हा बीडच्या ‘आकां’वर निशाणा
Mla Suresh Dhas : तुम्हाला राखेचा धंदा करण्यासाठी पिस्तुल लागतात का? असा थेट सवाल भाजपचे आमदार सुरेश धस (Mla Suresh Dhas) यांनी बीडच्या आकांवर केलायं. बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणी आमदार धस यांच्याकडून गंभीर आरोप केले जात आहेत. या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावरही धस यांच्याकडून आरोप केला जात आहे. अशातच बीडमध्ये सर्वाधिक पिस्तूल परवानग्या देण्यात येत असल्याने त्यावर बोलताना सुरेश धस यांनी थेट सवाल केलायं.
देशमुख प्रकरणावरून अंजली दामानियांचा रामदास आठवलेंसमोर तीव्र निषेध, म्हणाल्या ही माणूसकी..
आमदार सुरेश धस म्हणाले, परळीमध्ये कायदेशीर आणि बेकायदेशीर पिस्तूलधारकांची सर्वाधिक संख्या आहे. मुंबईत सुद्धा एवढे परवानेधारक नाहीत. बीडमध्ये आका आणि त्यांच्या आकांशिवाय दुसरं कोणी नाही. त्यामुळे तुम्हाला राखेचा धंदा करण्यासाठी पिस्तूल लागतात का? माझ्याकडे राखेच्या धंद्यांचे अनेक पुरावे आहेत, तुम्ही दाखवं म्हणाले तर मी दाखवणार असल्याचा थेट इशाराच आमदार सुरेश धस यांनी दिला आहे.
तसेच बीडमधील पिस्तूल धारकांवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कारवाई करावी, यासोबत प्रॉपर्टी अटॅचमेंटची जी ऑर्डर देण्यात आलीयं, ती साहेबांनी न थांबवता जलदगतीने सर्व काही उघड करावे, म्हणजे आकांसोबत कोणाची संपत्ती आहे हे उघड होणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय.
जी माहिती मिळाली ती लगेच बीड पोलिसांना पाठवली; अंजली दमानिया यांचा देशमुख हत्या प्रकरणात मोठा दावा
अन्यथा बीडचा बिहार नाही तर काबुलीस्तान होणार…
जिल्हा पोलिस दलातील अधिकारी चिरीमिरी घेऊन लोकांना पिस्तूल परवाना देत आहेत, कोणाही उठतंय आणि पिस्तूल परवाने काढत आहेत. कोणी लग्नात वर करुन दाखवत आहे, तर कोणी लक्ष्मीपूजनाला, चौकात, ढाब्यावर ठ्यॉय, ठ्यॉय करतंय, बीडमधील हे ठ्यॉय, ठ्यॉय लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं, जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी यावेळी आमदार सुरेश धस यांनी केलीयं.
पिस्तुलासाठी शिफारसी करणाऱ्या आमदारावरही कारवाई करा…
बीडमध्ये ज्या लोकांच्या पिस्तूल परवान्यासाठी आमदाराने शिफारसी केल्या असतील, त्याने आपलं पद भाड्याने दिलं असेल, त्या सर्व शिफारसी ऑन आणि ऑफ रेकॉर्ड तपासाव्यात. मी जरी शिफारस केली असेल तर माझ्यावरही कारवाई झाली पाहिजे. मी आयुष्यात फक्त दोनच शिफारस केलेल्या आहेत. माझ्याकडेही अनेक लोकं लाडं-लाडं पिस्तूल मिळण्यासाठी येतात, त्यांनी मी धुडकावून लावतोय. मी स्वत;ला कधी बंदुक मागितली नाही इतरांना कसं देऊ, त्यामुळे पिस्तुलासाठी शिफारसी करणाऱ्या आमदारावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलीयं.