भाजपला धक्का! ऐन निवडणुकीत माजी आमदाराचा राजीनामा; काय घडलं?
Vidhansabha Elections 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप कोणत्याही क्षणी जाहीर (Maharashtra Elections) होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. महाविकास आघाडीत इनकमिंग वाढलं आहेत. त्याचा फटका महायुतीतील पक्षांना बसत आहे. आताही भाजपला धक्का देणारी बातमी आली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं. पण ज्याने पक्षाचं काम केलं नाही. त्यालाच पक्षात घेऊन उमेदवारी दिली जात आहे, अशी खंत व्यक्त करत एक मोठ्या नेत्याने भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. माजी आमदार सुभाष साबणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेसश कार्यकारिणी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
मविआचं ठरलं! मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत जागावाटप पूर्ण; ‘त्या’ जागांचा तिढा सुटला?
सुभाष साबणे यांनी 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर देगलूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु, या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी त्यांचा पराभव केला होता. यानंतर 2021 मधील पोटनिवडणुकीत साबणे यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जितेश अंतापूरकर यांनी त्यांचा पराभव केला.
यानंतरही खचून न जाता त्यांनी निवडणुकीची तयारी सुरुच ठेवली होती. परंंतु, मध्यंतरीच्या काळात वेगळ्याच घडामोडी घडल्या. जितेश अंतापूरकर यांनी स्वतःच भाजपात प्रवेश केला. आता जितेश यांनाच तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत साबणे यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. भाजपातून आता तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
साबणे २०१४ मध्ये शिवसेनेचे देगलूर मतदारसंघाचे आमदार होते. आता त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे. आता अशा परिस्थितीत साबणे तिसऱ्या आघाडीकडून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात साबणे यांना कुणाकडून तिकीट मिळेल याचा खुलासा लवकरच होणार आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्याने ऐन निवडणुकीत भाजपाच्या अडचणी वाढणार आहेत.
विधानसभेपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, आमदार जितेश अंतापूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश
दरम्यान, कोरोना काळात आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचं निधन झालं होतं. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांनी जितेश अंतापूरकर निवडून आणले होते. आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँगेस देगलूर विधानसभा मतदारसंघात कोणाला संधी देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.