बीड : नाराजी नाट्य संपलं?; मुंडे बंधू-भगिनी एकत्र येण्याची परळीत पायाभरणी

बीड : नाराजी नाट्य संपलं?; मुंडे बंधू-भगिनी एकत्र येण्याची परळीत पायाभरणी

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले होते. कारखान्याचं आणि शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असून यातून चांगला पायंडा पडेल, असा विश्वास यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. मात्र मुंडे भावा-बहिणीची पुन्हा जुळलेली मनं म्हणजे भविष्यात एकत्र येण्याच्या निर्णयाची पायाभरणी आहे का? असा सवाल विचारला जात आहे. (Pankaja Munde and Dhananjay Munde came together for election of Vaidyanath Cooperative Sugar Factory)

पंकजा मुंडे भाजप सोडणार?

मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे बोलून दाखविली आहे. यामुळे त्या राष्ट्रवादी किंवा रासपमध्ये जाऊ शकतात असं बोललं जातं. नुकतंच एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मी भाजपमध्ये आहे, भाजप माझा पक्ष थोडीच आहे, असं वक्तव्य केलं होतं. तसंच वडिलांसोबत भांडण झालं तर भावाच्या घरीही जाऊ शकते, असं त्यांनी म्हटलं होतं.

एप्रिल महिन्यात बीड-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भारजवाडी या गावात भगवानबाबांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम नारळी सप्ताहाची सांगता झाली. यावेळी पार पडलेल्या किर्तनाला महंत नामदेव शास्त्री, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे तिघेही आवर्जून उपस्थित होते. यावेळी बोलतानाही आमच्या दोघांचे भविष्य काही वेगळं असेल. त्यासाठी काही वेळ वाट पाहा, घाई करु नका, असं सूचक व्यक्तव्य केलं होतं.

त्याचवेळी धनंजय मुंडे यांनीही  या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने आमच्या बहिण-भावाच्या नात्यांमधील काही गज का होईना अंतर कमी झालं. आम्ही दोघं वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचारानं काम करतो. आमच्या विचारांमध्ये भले अंतर असेल पण घरामधल्या संवादामध्ये एक तसूभरसुद्धा अंतर नसले पाहिजे, ते अंतर कमी झालं पाहिजे. पण आमचं एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही, असं सांगितलं होतं.

प्रीतम मुंडेंनीही भाजपला फटकारलं :

दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत, या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब आहे. सरकारनं खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, असं मत व्यक्त केलं होतं. सोबतच यावेळी त्यांनी 6 हजार रुपये देण्यात शेतकऱ्यांचा सन्मान नाही, असं म्हणतं प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेवरही टीका केली होती. मात्र त्यानंतर लगेच त्यांनी याबाबत खुलासा करत आपण असं म्हटलं नसल्याचं सांगितलं होतं. मात्र दोन्ही बहिणींच्या सध्याच्या भूमिका आणि भावा-बहिणींच्या जवळ येण्याच्याचर्चा यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube