पंकजा मुंडेंना मोठा धक्का, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटीचा छापा, 19 कोटींची मालमत्ता जप्त

  • Written By: Published:
पंकजा मुंडेंना मोठा धक्का, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटीचा छापा, 19 कोटींची मालमत्ता जप्त

GST Raid on Vaidyanath Cooperative Factory :लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Vaidyanath Cooperative Factory) चेअरमनपदी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची दोनेक महिन्यांपूर्वी बिनविरोध निवड झाली होती. या निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत राहिली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा पडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने (Central GST Commissionerate) कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE

केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा टाकून काही कागदपत्रांची तपासणी केली होती. त्यात या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर बेकायदेशीरपणे बुडवल्याचं स्पष्ट झाले. त्यानंतर काल औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे आहेत. वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर झालेली कारवाई हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जीएसटी विभागाच्या या छाप्याने एकच खळबळ उडाली आहे.

गढूळ वातावरणावर कवींनी परखडपणे भाष्य केलं पाहिजे, राज ठाकरेंचं आव्हान 

औरंगाबाद येथील जीएसटी आयोगाच्या आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, जीएसटी प्राप्त झालेल्या या नोटिसांना कोणताही प्रतिसाद न दिल्याने काही अधिकाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी कारखान्याला अचानक भेट देऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. साखर कारखान्यातील आर्थिक व्यवहाराची अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली होती. यात या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर बेकायदेशीरपणे बडवल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी कारखान्यातील बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरीसह 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या मालमत्तेचा लिलाव करून हा कर वसूल केला जाणार असल्याचे समजते.

पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपा वाद लपून राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे वैद्यनाथ कारखान्यावर झालेल्या कारवाईबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube