वाल्मिक कराडच्या खास गँगवर मोक्का, दहशतीचा पॅटर्नही ‘तोच’, गुन्ह्यांची कुंडली मोठी

walmik karad gang who took action under the-MCOCA: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा कारागृहात आहे. देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आलेला आहे. गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा राज्यात बदनाम झालेला आहे. येथील एसपी नवनीत कॉवत यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गुन्हेगारांची सफाई मोहीम सुरू केलीय. कॉवत यांनी चौथ्या टोळीला मोक्का (MCOCA) लावलाय. आता कोणत्या टोळीला मोक्का लावलाय. या टोळीचा वाल्मिक कराडशी (walmik karad) संबंध कसा आहे ? या टोळीविरुद्ध कोणते गंभीर गुन्हे दाखल आहे, गुन्ह्याची पद्धती कशी आहे हे व्हिडिओमधून जाणून घेऊया…..
परळीतील रघुनाथ फड, जगन्नाथ फड, सुदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गिते या पाच जणांना एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी 7 मे रोजी अटक झाली होती. सुदीप सोनवणे वगळता इतरांना जामीन मिळाला. तर धनराज फड आणि ज्ञानोबा ऊर्फ गोट्या गित्ते हा फरार आहेत. या टोळीचा प्रमुख रघुनाथ फड हा आहे.
टोळीची परळी, अंबाजोगाईत दहशत
या टोळीविरुद्ध बीडमधील परळी शहर, अंबाजोगाई ग्रामीण आणि संभाजीनगर या तीन पोलिस स्टेशनला दहा गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, दंगा करणे, कट रचणे, अवैधपणे शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे, रस्ता आडविणे, मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, गंभीर दुखापत करणे या पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील नऊ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल आहेत. तर एका गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
ही गँग वाल्मिक कराडचीच
ही गँग वाल्मिक कराडशी संबंधित आहे. या टोळीचे सदस्य आणि वाल्मिक कराड यांचे फोटोही समोर आले आहेत. गोट्या गित्ते हा तर वाल्मिक कराडला पुण्यातून बीडला आणताना त्याच्या ताफ्यात होता. तर सुदीप सोनवणे हा बीड कारागृहात कराड आणि गित्ते गँग यांच्या झालेल्या वादाचे कारण होता, असे आता समोर आले आहे.
पोलिसांवर दबाव ? न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा
या टोळीविरुद्ध मार्च महिन्यात एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तोही न्यायालयाच्या आदेशानंतर. परळीतील तडोळी येथील शेतकरी सहदेव वाल्मिक सातभाई यांना या टोळीने मारहाण केली होती. सातभाई हे परळी येथे ट्रॅक्टरचे काम करण्यासाठी व हप्ता भरण्यासाठी 2 लाख 70 हजार रुपये घेऊन मोटारसायकलने जात होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेले रघुनाथ फड व इतर आठ जणांनी सहदेव सातभाई यांना अडविले. सर्व जणांनी सातभाई यांना काठी, लोखंडी रॉडने मारहाण करत त्यांच्याकडील पैसे काढून घेतले. सातभाई यांनी बचावासाठी आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले. त्यावेळी आरोपींनी तू आता वाचल्यास परंतु नंतर आम्ही तुला सोडणार नाहीत, अशी धमकी दिली. सातभाई यांची फिर्यादही पोलिसांनी व्यवस्थित घेतली. त्यानंतर ते न्यायालयात आहे. वाहनातून येऊन अडवून लोखंडी रॉड, काढीने मारहाण करणे अशी या टोळीचें गुन्ह्याची पद्धत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले व त्याची टोळीची गुन्हेगारीची पद्धत याच पद्धतीची होती.
आरोपींना जामीन आणि आता मोक्का
या टोळीतील मुख्य आरोपी रघुनाथ फडसह चार जणांना नुकताच जामीन झालेले आहे. सुदीप सोनवणे हा अटकेत आहे. दोन आरोपी फरार आहेत. या आरोपींना शोधून त्यांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. गेल्या पाच महिन्यात पोलिस अधीक्षकांना कराड व घुले गँग, बीडची आठवले गँग, आष्टीतील भोसले टोळी, परळीतील एक आणि आता फड अशा पाच टोळ्यांवर मोक्का लावला आहे. त्यामुळे टोळींना जामीन मिळणार नाही. आरोपींना अटक असताना गुन्ह्यांची सुनावणी होईल, त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल. परंतु टोळ्यांमधील अनेक सदस्य फरारच आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना तुरुगांत टाकण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.