2024 ला जिवंत राहिलो तर भाजपला मतदान करणार नाही, पंकजा मुंडेंच्या मामांची घोषणा
Maharashtra politics : राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर मनसे नेते आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर रामायणचं उलटे फिरले असून सीतेने सत्तेसाठी रावणाचा हात धरला अशी परिस्थिती निर्माण झाली. मी जर 2024 ला जिवंत राहिलो तर भाजपला मतदान करणार नाही, अशी घोषणा प्रकाश महाजन यांनी केली आहे.
काल झालेल्या शपथ विधीनंतर मी अस्वस्थ आहे. त्यामुळे आणीबाणीच्या काळात जो करावास झाला, त्यानंतर जो सन्मान निधी मिळत होता. तो सन्मान निधी मिळू नये, असे पत्रक प्रकाश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
दरम्यान या घटनेनंतर राजकीय वाद असणारे पंकजा मुंडे आणि भाऊ धनंजय मुंडे दोघेही सत्तेत आले आहे. परंतु यावर भाष्य करणे महाजन यांनी टाळले. येत्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आले, तर त्यांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
तुम्हाला जर सत्ता पाहिजे होती तर तुमच्या आमदारकीचा राजीनामा देऊन जायला पाहिजे होते. तुम्ही येणाऱ्या पिढीला काय आदर्श निर्माण करून देणार आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. या सगळ्या गोष्टीला हा नवीन भाजप जबाबदार असल्याचे महाजन यांनी म्हटले. शरद पवार यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीला नतमस्तक होऊन आपल्या पापाचे प्रायश्चित करायला पाहिजे होते, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी भाजपासह राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे.