मलाही एक मुलगी आहे…; आरोपांनंतर आमदार राहुल कुल पहिल्यांदाच आले समोर
आपली भूमिका स्पष्ट करताना कुल यांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर ते सतत मुलीच्या नातेवाईकांच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या संपर्कात होते.
MLA Rahul Kul’s clarification : भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याचं स्पष्ट दिसत आहे. सुरुवातीला अपहरणाचा आरोप करण्यात आला होता; मात्र संबंधित मुलीने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात आपण स्वतःच्या इच्छेने मुलासोबत गेल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री मुलगा आणि मुलगी दोघेही स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी मुलीचा सविस्तर जबाब नोंदवला असून तिने स्पष्ट केले की, आपले अपहरण झालेले नाही.
या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून राहुल कुल यांच्या भूमिकेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना कुल यांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर ते सतत मुलीच्या नातेवाईकांच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या संपर्कात होते. माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, मात्र मलाही एक मुलगी आहे. माझ्या घरात महिला पदाधिकारी आहेत. मुलीची बाजू घेतल्यामुळे माझ्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत, असे ते म्हणाले.
पुढे त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात वस्तुस्थिती तपासून मगच आरोप करावेत. माझी भूमिका नि:पक्षपाती आहे. त्यामुळे काहींना ती न पटल्यामुळे प्रकरणाला राजकीय रंग दिला जात आहे. गुन्हेगार कोण आहेत, मी त्यांना ओळखत नाही. कुणी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवावे किंवा आरोप करावेत, त्याच्याशी माझा संबंध नाही. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासावेत. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मुलीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून त्यांना भेटून मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
सकाळपर्यंत सांगितलं बंडखोरी करणार नाही पण त्यांनी… रविंद्र चव्हाण भिवंडी प्रकरणावर संतापले
दरम्यान, मुलीच्या आईने मात्र गंभीर आरोप केले आहेत. अझर शेख याला राहुल कुल यांचा पाठिंबा असल्याचा दावा तिने केला आहे. त्यांच्या दबावाखाली माझी मुलगी गेली आहे. हिंदू समाजाने जागं झालं पाहिजे, असे म्हणत तिने या प्रकरणात मंत्री दत्त भरणे यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. अझर शेख हा मुलीच्या प्रियकराचा चुलता असून तो कुल यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, मुलीने प्रतिज्ञापत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध असल्यामुळे परस्परांवर विश्वास ठेवून आई आणि भावाची नजर चुकवून आपण प्रियकरासोबत निघून गेलो, तसेच पुढील आयुष्य त्याच्यासोबतच व्यतीत करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने लेखी स्वरूपात नमूद केले आहे. या सर्व घडामोडींमुळे भिगवण प्रकरण अधिकच चर्चेत आले असून, पोलिसांचा पुढील तपास आणि प्रशासनाची भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
