Letsupp Special : रोहित पवार राष्ट्रवादीत अजितदादांची जागा घेत आहेत का?

Rohit Pawar, Ajit Pawar, Sharad Pawar

– ऋषिकेश नळगुणे :

9 जुलै 2023. आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दिलीप वळसे पाटलांची सभा सुरु होती. बंडखोरीची भूमिका स्पष्ट करत असताना अचानक त्यांनी गिअर बदलला आणि रोहित पवारांबद्दल बोलत म्हणाले “त्यांचं वय 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे.”

24 ऑगस्ट 2023. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले, “रोहित पवार हे फार नवखे आहेत. ते कशासाठी एवढे मोठे धाडस करत आहेत, मला माहित नाही. बहुतेक त्यांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे.”

26 ऑगस्ट 2023. अजित पवार बंडखोरीनंतर पहिल्यांदा बारामतीला आले होते. त्याचवेळी त्यांच्या गटाचे मुख्य प्रतोद अमोल मिटकरींनी एक ट्विट केले. “तुफान, तुफान, तुफान… तुफान आलंया. अजितदादा, हॅट्स ऑफ. सभा बारामतीला, मात्र अस्वस्थता पसरली कळवा, जामखेडमध्ये. नाद खुळा.”

तारीख बदलली, स्थळं बदलली, टीका करणारी नावं बदलली. टार्गेट मात्र एकच. राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार!

अजित पवार यांच्या गटातील नेत्यांचा बंडाच्या पहिल्या आठवड्यापासून आजपर्यंत एका नेत्यावर टीकेचा थेट सुर आहे तो आमदार रोहित पवारांवर. बंडानंतर रोहित पवार यांनी सत्तेच्या वळचणीला न जाता शरद पवारांसोबत राहून संघर्षाची भूमिका स्वीकारली. बंडाच्या पहिल्या दिवसापासूनच ते आजोबांसोबत राहिले. अगदी पहिल्या पत्रकार परिषदेला ते शरद पवारांच्या शेजारीच होते. दुसऱ्या दिवशी कराडला. त्यानंतर येवल्याच्या सभेत, महाराष्ट्राच्या विविध भागातील दौऱ्यांमध्ये, बीडच्या सभेत, कोल्हापूरच्या सभेत ते सर्वात पुढे राहून लढताना दिसून आले.

दौरे आणि सभा गाजवत असतानाच त्यांनी माध्यमांमधून आणि सोशल मीडियावरुन अजित पवार वगळता त्यांच्या गटातील इतर नेत्यांवर मग ते दिलीप वळसे पाटील असो, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ असो या सगळ्यांवर थेट टीका करताना, आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये बड्या नेत्यांना अंगावर घेताना दिसले. एकूणच अजित पवार आणि त्यांच्या गटाने शरद पवारांची साथ सोडल्यानंतर तयार झालेली पक्षातील पोकळी भरुन काढण्याचा आणि आपली राजकीय वाटचाल करताना ते दिसत आहेत. पण यामुळे ते राष्ट्रवादीत अजित पवार यांची जागा घेत आहेत का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आधी आपल्याला रोहित पवार काकांसोबत का गेले नाहीत? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे :

याबाबत बोलताना राजकीय विश्लेषक सांगतात, रोहित पवारांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय विचार करून घेतलेला दिसतो. ते स्वत:ला ‘लंबी रेस का घोडा’ मानतात. आता ते अजितदादांसोबत गेले असते तर सत्तेत गेलेल्या इतर आमदारांपैकी एक आमदार एवढीच त्यांची ओळख उरली असती. पण आता ते शरद पवार गटातील महत्त्वाचे नेते बनले आहेत. रोहित पवारांना आता सत्ता तात्पुरती मिळाली असती. पण यशवंतराव चव्हाण, शरद पवार हा वारसा पुढे न्यायचा असेल, तर भाजपसोबत जाऊन चालणार नाही, हे रोहित पवारांना कळलं आहे. खरंतर रोहित पवार स्वत: उद्योजकही आहेत. उद्योग सांभाळायचे म्हणजे सत्तेचं पाठबळ लागतं. मात्र, तरीही त्यांनी धोका पत्कारला आहे, याचा अर्थ ते तात्पुरत्या फायद्यावर लक्ष ठेवून नाहीत. ते दूरचा विचार करताना दिसत आहेत.

फक्त राष्ट्रवादीतील नाही तर महाराष्ट्रातील स्पेस घेत आहेत :

या मुद्द्याला आणखी विस्तृत स्वरुपात सांगताना एक ज्येष्ठ पत्रकार म्हणाले, रोहित पवार फक्त राष्ट्रवादीतीलच पोकळी भरुन काढत नाहीत. ते पवारांचे नातू असल्यामुळे नैसर्गिक दृष्ट्या ती जागा त्यांच्याकडे येणारच आहे. मात्र सध्या रोहित पवार महाराष्ट्रातील विरोधी पक्षात असलेला तरुण, आक्रमक आणि मास बेस असलेला नेता ही जी पोकळी तयार झाली आहे, ती भरुन काढताना दिसत आहेत. सध्या काँग्रेसमध्ये जे तरुण चेहरे आहेत, ते त्यांच्या त्यांच्या भागापुरते मर्यादित आहेत. उदाहरण घ्यायचं झाल्यास अमित देशमुख, प्रणिती शिंदे यांचं घेता येईल. शिवसेनेत आदित्य ठाकरे यांचे नाव घ्यायचं झाल्यास त्यांचं बहुतांश लक्ष मुंबईवर दिसून येते.

यानंतर संपूर्ण राज्यात फिरु शकेल, जाऊ शकेल, आक्रमक भूमिका मांडू शकेल, असा तरुण चेहरा नाही. नेमकी हीच जागा रोहित पवार घेऊ पाहत आहेत. वय हातात असल्याने पुढील राजकारण करण्यासाठी ते महाराष्ट्र भर विस्तारु पाहत आहेत. आजपर्यंत त्यांनी किमान सहा अधिवेशनात भाग घेतला. पण या अधिवेशनात पक्षातील नेत्यांची संख्या कमी झाल्याने, बोलण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी त्यांना जास्त संधी मिळाली. यातून मग त्यांनी एमआयडीसी, उद्योग, एमपीएससी अशा मुद्द्यांना हात घातला. त्याचवेळी शेतकऱ्यांचेही प्रश्न मांडत अधिवेशनात चौफेर प्रश्न विचारण्याची किमया साधली.

भाजपला आणि अजितदादांसोबच्या नेत्यांना अंगावर घेणे ही घेतलेली क्यॅलक्युलेटेड रिस्क :

अजित पवार यांच्या बंडानंतर रोहित पवार यांनी एकाचवेळी भाजप आणि अजित पवार यांच्या गटातील नेत्यांना अंगावर घेतल्याचे दिसून येते. पण ही रिस्क त्यांनी स्वीकारली आहे. जास्तीत जास्त काय होऊ शकते तर कर्जत जामखेडमध्ये त्यांचा पराभव होऊ शकतो हा अंदाज त्यांना आहे. पण वय हातात असल्याने त्यांना लाँग टर्मचे राजकारण आहे. शिवाय आता मिळालेल्या संधीतून आणि पुढच्या वर्षभरात ते महाराष्ट्रभर फिरुन आपला मास बेस तयार करुन पराभूत झाल्यासही सक्रिय राहू शकू याची तयारी करत आहेत. याचमुळे त्यांनी ही क्यॅलक्युलेटेट रिस्क घेतली असावी.

मात्र त्याचवेळी थेट काकांशी संघर्ष टाळण्यासाठी रोहित पवार वेगळी मांडणी करताना दिसतात. ते अजित पवारांवर थेट बोलत नाहीत. ते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या इतर नेत्यांवर टीका करताना दिसतात, कारण हे नेते त्यांना कर्जत जामखेडमध्ये धोका निर्माण करु शकत नाहीत याचा अंदाज त्यांना आहे, असे राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. एकूणच काय तर रोहित पवार यांनी सगळी गणित मांडून राजकीय दिशा ठरवली आहे, असंच म्हणायला हवं.

Tags

follow us