“घरात घुसून मारेन!”; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच संजय गायकवाडांचा जुना ‘ट्रॅक रेकॉर्ड’ चर्चेत!

MLA Sanjay Gaikwad गायकवाड यांनी जेव्हा जेव्हा मर्यादा ओलांडली, तेव्हा फडणवीसांनी सुनावले तर शिंदेंनी शिस्तीचा दाखला दिला पण...

  • Written By: Published:
"घरात घुसून मारेन!"; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच संजय गायकवाडांचा जुना 'ट्रॅक रेकॉर्ड' चर्चेत!

MLA Sanjay Gaikwad And Top 7 Controversial Statements Cases : कधी मटण-दारूचं आमिष, कधी राहुल गांधींची जीभ कापण्याची भाषा, तर कधी पोलिसांनाच अकार्यक्षम म्हणणारे शिंदे गटाचे बुलंद आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निमित्त आहे एका व्हायरल ऑडिओ क्लिपचं. पण गायकवाड आणि वाद हे काही नवीन नातं नाही. आजवर गायकवाड यांच्या कोणत्या विधानांमुळे आणि प्रकरणांनी महाराष्ट्राला आणि महायुतीला हादरे बसले आहेत? त्याबद्दल जाणून घेऊया…

तीन कोटी अन् शंभर बोकड; आमदार संजय गायकवाड यांनी सांगितला ZP निवडणुकीचा खर्च

1. ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून राडा

व्हायरल होणाऱ्या ताज्या प्रकरणात गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी दिवंगत विचारवंत आणि कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शिर्षकावरून आक्षेप घेतला आहे. यावरून गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून “घरात घुसून मारेन” अशी धमकी दिली आणि “ब्राह्मण आहे का तू?” असा जातीय उल्लेख करत शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. MLA Sanjay Gaikwad And Controversy 

2. वाघाची शिकार केल्याचा दावा

फेब्रुवारी 2024 मध्ये एका मुलाखतीत त्यांनी आपण 1987 मध्ये वाघाची शिकार केली होती आणि तोच दात आपण लॉकेटमध्ये घातले असल्याचे वक्तव्य त्यावेळी त्यांनी केले होते. या विधानानंतर वनविभागाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून वाघाचा दात जप्त केला होता.

3. शिवजयंती मिरवणुकीत तरुणाला मारहाण

मार्च 2024 मध्ये बुलढाण्यातील शिवजयंती मिरवणुकीत कायदा हातात घेत गायकवाड यांनी एका तरुणाला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

4. राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11लाखांचे बक्षीस

सप्टेंबर 2024 मध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा निषेध करताना गायकवाड यांची जीभ घसरली. त्यांनी जाहीरपणे म्हटले की, “जो कोणी राहुल गांधींची जीभ कापेल, त्याला मी 11 लाख रुपयांचे इनाम देईन.”

हिंदीच काय आता उर्दूही शिका, म्हणजे अतिरेक्यांचे…; आमदार संजय गायकवाड बरळले

5. मतदारांना ‘दारू-मटण’ हवं असतं!

जानेवारी 2025 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना गायकवाड यांनी मतदारांवरच निशाणा साधला होता. “निवडणुकीत मतदारांना विकास नको, तर दारू आणि मटण हवं असतं,” असं वादग्रस्त विधान करून त्यांनी राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठवली होती.

6. पोलिसांना म्हटलं ‘चोरांचे सरदार’

एप्रिल 2025 मध्ये गायकवाड यांनी थेट गृहखात्यावरच हल्ला चढवला. “महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम आणि भ्रष्ट खातं जगात कुठेही नाही,” असे विधान त्यांनी केले. इतकंच नाही तर, बुलढाण्यातील काही पोलिसांना त्यांनी ‘चोरांचे सरदार’ म्हणत खळबळ उडवून दिली होती.

7. आमदार निवासातील ‘बनियन-टॉवेल’ राडा

जुलै 2025 मध्ये मुंबईतील ‘आकाशवाणी’ आमदार निवासात गायकवाड यांनी मोठा राडा केला होता. कॅन्टीनमध्ये शिळे आणि निकृष्ट जेवण मिळाल्याचा आरोप करत गायकवाड चक्क बनियन आणि टॉवेलवरच कॅन्टीनमध्ये धावून गेले. तिथे त्यांनी कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरले आणि कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची कबुलीही दिली. “मी सौम्य मारहाण केली, मला पश्चाताप नाही,” असे म्हणत त्यांनी या कृत्याचे समर्थन केले होते.

संजय गायकवाड यांनी जेव्हा जेव्हा मर्यादा ओलांडली, तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो या दोन्ही नेत्यांनी त्यांना कडक शब्दांत खडेबोल सुनावले आहेत, मात्र, या समजेचा आणि खडेबोल सुनावण्याचा गायकवाड यांच्यावर फारसा परिणाम होत नसल्याचे त्यांच्या ताज्या ‘ऑडिओ क्लिप’ प्रकरणावरून दिसून येत आहे. त्यामुळे आता वारंवार वाद ओढवून घेणाऱ्या गायकवाडांवर पक्षश्रेष्ठी काही कारवाई करणार की गायकवाडांची ही ‘तोफ’ अशीच धडाडत राहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us