सिसपे घोटाळ्यातील आरोपींचा दुबई ते फिजीपर्यंत पाठलाग; खासदार निलेश लंके यांचा मोठा दावा
सिसपे घोटाळ्याप्रकरणी अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाचे खुलासे केले.
MP Nilesh Lanke makes a bold claim : राज्यभर गाजलेल्या सिसपे घोटाळ्याप्रकरणी अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाचे खुलासे केले. या घोटाळ्याचा सर्वाधिक फटका आपल्या मतदारसंघातील नागरिकांना बसल्याचे सांगत त्यांनी आरोपींचा दुबईपासून फिजीपर्यंत पाठलाग केल्याचा दावा केला. घोटाळ्यातील आरोपींविरोधात इंटरपोल आणि केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत कारवाई सुरू करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निलेश लंके म्हणाले की, सिसपे घोटाळ्यामुळे हजारो सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान झाले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, काहींचे संसार रस्त्यावर आले. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आपण या प्रकरणात स्वतः पुढाकार घेतला. या घोटाळ्याची माहिती आणि नागरिकांच्या तक्रारी घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांनीही ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
लंके यांनी सांगितले की, घोटाळ्यातील मुख्य आरोपी देशाबाहेर, विशेषतः दुबईमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र टीम दुबईमध्ये पाठवली. या टीमने आरोपींच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले आणि त्यासंदर्भातील माहिती वेळोवेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे सुपूर्द केली. या तपासात मिळालेली कागदपत्रे, पुरावे आणि विविध माहिती न्यायालयातही सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आरोपींविरोधात इंटरपोल आणि सीबीआयमार्फत कारवाईची मागणी केल्याचेही निलेश लंके यांनी स्पष्ट केले. त्यानुसार नवनाथ औताडे, अगस्थ्य मिश्रा, राहुल काळोखे, ययाती मिश्रा, शुभम औताडे, गौरव औताडे आणि सुखदेव औताडे अशा एकूण सात जणांविरोधात इंटरपोलच्या माध्यमातून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांचा राजीनामा?; कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार परिषदेत बोलताना लंके यांनी दावा केला की, 2025 पर्यंत त्यांची टीम परदेशात सक्रिय होती. आरोपींची राहण्याची ठिकाणे, व्यवसाय, प्रवास, आर्थिक व्यवहार आणि इतर हालचालींबाबतची माहिती गोळा करून ती तपास यंत्रणांना देण्यात आली. या संपूर्ण तपासादरम्यान आरोपी राहुल काळोखे याला त्याच्याविरोधात इंटरपोलची कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने दुबईमधून पलायन केले. त्यानंतर तो बहरीनमार्गे फिजीमध्ये गेल्याची माहिती त्यांच्या टीमला मिळाली.
इमिग्रेशन यंत्रणा आणि विविध संपर्कांच्या माध्यमातून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आले. अखेर फिजीमध्ये राहुल काळोखे याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू असून तो आज किंवा उद्या भारतात दाखल होऊ शकतो, असा दावा निलेश लंके यांनी केला. यावेळी त्यांनी आरोपींचे व्यवसाय परवाने, व्हिसा, पासपोर्ट आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज पत्रकारांसमोर सादर केले. या सर्व कागदपत्रांवरून हा घोटाळा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, आतापर्यंत सरकारकडून या घोटाळ्यातील कोणतीही रक्कम जप्त करण्यात आलेली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
निलेश लंके म्हणाले की, सध्या एक आरोपी तपास यंत्रणांच्या हाती लागला असला तरी उर्वरित आरोपींना पकडणे आणि घोटाळ्यातील पैसा परत मिळवणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांनी आरोपींच्या मालमत्तांचा शोध घ्यावा, त्या जप्त करून विक्री करावी आणि त्यातून मिळणारी रक्कम फसवणूक झालेल्या नागरिकांना परत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अहिल्यानगर हादरले, भांडण कसे करतात ते दाखवतो म्हणत मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांचा घेतला चावा
राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा घोटाळ्यातील पीडितांना न्याय मिळवून देणे आवश्यक असल्याचे सांगत लंके म्हणाले की, सामान्य लोकांचे कष्टाचे पैसे कुणी लुबाडत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आपलीही जबाबदारी असते. त्यामुळे आपण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले. पोलिसांनी त्यांच्या अधिकारात राहून चांगले काम केले आहे. मात्र, आरोपी देशाबाहेर पळून गेल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी अतिरिक्त प्रयत्नांची गरज होती आणि त्यासाठी आपण आपल्या संपर्कांचा वापर केला.
समाजात दोन प्रकारचे लोक असतात. एक फक्त बोलघेवडे असतात आणि दुसरे प्रत्यक्ष काम करतात. आम्ही बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवतो. या घोटाळ्यातील प्रत्येक पीडित व्यक्तीला न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील, असे निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितले. सिसपे घोटाळ्यातील आरोपींच्या अटकेसंदर्भातील आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्याबाबतच्या निलेश लंके यांच्या दाव्यांमुळे आता या प्रकरणाची पुन्हा एकदा राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.