सुतावरुन स्वर्ग! 10 ग्रॅम ड्रग्जवरुन मुंबई पोलिसांना लागला थेट ललित पाटीलचा सुगावा

सुतावरुन स्वर्ग! 10 ग्रॅम ड्रग्जवरुन मुंबई पोलिसांना लागला थेट ललित पाटीलचा सुगावा

Lalit Patil Arrest : मुंबई : फरार ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ललित पाटील राज्यभरात चर्चेत आला होता. त्यावरुन मोठे राजकारण पाहायला मिळाले. विरोधकांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अखेर मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला अटक केली आहे. यानंतर त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने सोमवारपर्यंत (23 ऑक्टोबर) पोलिस कोठडी सुनावली आहे. (Mumbai Police got a direct clue of Lalit Patil from 10 grams of drugs)

पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 10 ग्रॅम ड्रग्ज विकताना अन्वर सईद याला पहिली अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात आणखी कारवाई करण्यात आली. डोंगरी, पुणे, नाशिक, एमएमआर रिजन आणि आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यात दिडशे किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त करण्यात आले. याची किंमत जवळपास 300 कोटी रुपये आहे.

याच कारवाईदरम्यान, ललित पाटीलचा सुगावा लागला. बंगळुरू आणि चेन्नईच्या मध्ये एक जागा आहे तिथून त्याला ताब्यात घेतलं. ललित पाटील हा या प्रकरणातील पंधरावा आरोपी आहे. या प्रकरणात भूषण पाटील हा ललितचा भाऊही आरोपी आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय आमची केस केवळ ड्रग्जशी संबंधित आहे. पुण्यातून तो पळून जाण्याप्रकरणी पुणे पोलिसांकडे IPC 224 अंतर्गत स्वतंत्र केस आहे. त्याचा तपास स्वतंत्र होईल. पण ललित चेन्नईतून कुठे जाण्याच्या प्रयत्नात होता, कसा गेला या सगळ्या गोष्टी पोलिस चौकशीतून समोर येतील. , असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मी पळून गेलो नाही, पळवंल गेलं :

दरम्यान, स्वतः ललित पाटीलने आपण पुण्यातील ससून रूग्णालयातून पळलो नव्हतो तर, मला पळवलं गेलं होतं असा खळबळजनक दावा केला आहे. यात कुणाकुणाचा हात आहे हे सर्व समोर आणणार असल्याचेही पाटील याने म्हटले आहे. वैद्यकीय तपासणीसाठी नेताना पाटीलने वरील खळबळजनक दावे केले आहेत. त्यामुळे चौकशीत ललित पाटील नेमकी कोणा-कोणाची नावे घेतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube