ट्रेनिंग होल्ड करुन परत बोलावले : IAS पूजा खेडकर यांच्यावर पहिली मोठी कारवाई

ट्रेनिंग होल्ड करुन परत बोलावले : IAS पूजा खेडकर यांच्यावर पहिली मोठी कारवाई

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्यावर मसुरीच्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकर यांचा पुढील जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम थांबविण्यात आला असून त्यांना अकादमीमध्ये परत बोलावून घेतले आहे. यानंतर राज्य शासनानेही त्यांची तात्काळ जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्तता केली आहे. (Lal Bahadur Shastri National Academy of Administration, Mussoorie action against controversial IAS officer Pooja Khedkar)

पूजा खेडकर या सध्या वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाचा पुढचा टप्पा अकोला येथे पार पडणार होता. 15 जुलैपर्यंत त्यांना अकोला येथे उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. इथे 19 जुलैपर्यंत आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत त्यांचे प्रशिक्षण चालणार होते. पण आता खेडकर यांचा संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमच थांबविण्यात आला आहे. आता खेडकर यांना 23 जुलैपर्यंत मसुरीमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

पूजा खेडकर यांच्यावर काय आहेत आरोप?

सुरुवातीला पूजा खेडकर या केवळ त्यांच्या वागणुकीमुळे चर्चेत आल्या होत्या. स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल झाले. याची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य शासनाला लिहिलेले पत्र समोर आले. त्यातून हे प्रकरण केवळ ऑडी गाडी पुरतेच मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले.

या पत्राप्रमाणे, खेडकर यांची ऑफिसमधील वागणूकही राजेशाही होती. स्वतंत्र केबिनची, गाडीची, बंगल्याची आणि शिपायाची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. जिल्हाधिकारी बाहेर गेले असताना, त्यांनी वरिष्ठांचे अँन्टी चेंबर बळकावल्याचेही समोर आले होते. त्यांच्या या वागणुकीवर बेशिस्तपणाचा ठपका ठेवत दिवसे यांनी पत्र लिहून खेडकर यांच्या बदलीची मागणी केली.

त्यानंतर खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदलीही झाली. पण जसे जसे दिवस जातील तसे तसे त्यांच्याशी संबंधित रोज एक नवे प्रकरण समोर येत गेले. त्यांनी अपंगत्व आणि ओबीसी (नॉन क्रिमिलेअर) कोट्यातून युपीएससीची परीक्षा दिल्याचे समोर आले. पण या दोन्ही प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यांनी 52 टक्के दृष्टी दोषाचे आणि मानसिकरित्या अस्वस्थाचे प्रमाणपत्र कसे मिळविले असे विचारले जाऊ लागले.

पूजा यांचे वडील दिलीप खेडकर हे स्वतः सनदी अधिकारी होते. त्यांची पेन्शनच काही लाखांमध्ये असते. त्याचबरोबर त्यांनी अमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढविताना 40 कोटींची संपत्ती दाखविली होती. स्वतः पूजा खेडकर यांचीही 17 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर येऊ लागली. तरीही त्यांना हे प्रमाणपत्र कसे मिळाले? याबाबत तपास व्हायला पाहिले अशी मागणी केली जाऊ लागली. माहिती अधिकारी कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी हे प्रकरण उचलून धरले.

या प्रकरणानंतर पूजा खेडकर यांची संपत्ती, बंगला, बंगल्याच्या आवारातील पाच गाड्या, विविध कंपन्या, फ्लॅट, जमीन अशा गोष्टींची चर्चा होऊ लागली. हे सुरु असतानाच मनोरमा खेडकर यांचा एक वर्षापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल झाला. यात पिस्तुलाच्या आधारे त्या एका शेतकऱ्याला धमावत असल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्या बंदुकीचे लायसन्स का रद्द करु नये अशा आशयाची पोलिसांची नोटीस धडकली.

आता पूजा खेडकर यांनी नाव बदलून अकरा वेळा युपीएससीची परीक्षा दिली असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सहा आणि ओबीसी कोट्यातील उमेदवारांना नऊवेळा परीक्षा देता येते. पण हे प्रयत्न संपल्यानंतर पूजा दिलीप खेडकर ऐवजी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे नाव बदलून त्यांनी अकरा वेळा परीक्षा दिली असल्याचे बोलले जात आहे.

या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर मसुरीच्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागिवला होता. हा अहवाल अकादमीला प्राप्त होताच पत्र पाठवून पूजा खेडकर यांना परत पाठविण्यास सांगितले. त्यानुसार राज्य सरकारने खेडकर यांचा पुढील जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम थांबविला असून त्यांची तात्काळ जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्तता केली आहे. त्यांना 23 जुलैपर्यंत मसुरीमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube